पुण्यातील व्यापारी महासंघाने दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळा वाढवून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. राज्यात अन्य ठिकाणी दुकानांसाठी निर्बंध शिथिल केलेल असून, पुण्यातच व्यापाऱ्यांना निर्बंध का लादले जात आहेत, असा सवाल त्यांच्याकडून सरकारला केला जात आहे. तर, महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने देखील व्यापाऱ्यांची बाजू लावून धरत, राज्य सरकारवर या मुद्द्यावरून टीका केली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत, महाविकास आघाडीने अंतर्गत वाद मिटवावेत आणि पुणेकरांना न्याय द्यावा, असं म्हटलं आहे. तर, पुणे महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने, राज्य सरकार दुजाभाव करत असल्याची भावना पुणेकरांमध्ये निर्माण होत आहे, असं भाजपाने म्हटलेलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते अतुल भातखळखर यांनी देखील राज्य सरकारवर टीका केली आहे.

पुण्यामध्ये गेले महिनाभर पॉजिटिव्हीटी रेशो हा ४% पेक्षा ही खाली असताना देखील केवळ भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे राज्य सरकार दुजाभाव करत असल्याची भावना पुणेकरांमध्ये निर्माण होत आहे. राज्य सरकारने अशा प्रकारे दुजाभाव करणे हे रोगट व द्वेषपूर्ण मानासकितेचे लक्षण आहे. अशी टीका भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.

तर, “पुण्यात निर्बंध शिथिल करायचे असतील तर प्रस्ताव पाठवा, असं आरोग्यमंत्री म्हणाले. मग प्रश्न हा पडतोय, असा प्रस्ताव मुंबईने आणि शिथीलता दिलेल्या इतर जिल्ह्यांनी दिला होता का?” असा सवाल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महाविकासआघाडी सरकारला सवाल केलेला आहे.

“ महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने राज्य सरकार दुजाभाव करत असल्याची पुणेकरांमध्ये भावना…”

मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का?, असा प्रश्न मुरलीधर मोहोळ यांनी या अगोदर ट्विटरवरुन विचारलाय. मोहोळ यांनी या नव्या आदेशांमध्ये पुण्यातील निर्बंध कायम ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय. “पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी ४ टक्क्यांच्या आत असतानाही लेव्हल तीनचे निर्बंध कायम ठेवणे, हा पुणेकरांवर अन्याय आहे. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? शहरात सलग महिनाभर पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांच्या खाली नोंदवला गेला आहे,” असं मोहोळ यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.