कोपरगाव पीपल्स बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ठोळे-लोहाडे पॅनेलने निर्विवाद वर्चस्व गाजवत बारा जागा जिंकल्या. प्रतिस्पर्धी दोन्ही स्वतंत्र उमेदवारांचा निवडणुकीत धुव्वा उडाला.
बँकेच्या निवडणुकीतील ठोळे-लोहाडे पॅनेलचे पाच उमेदवार पूर्वीच बिनविरोध विजयी झाले होते. उर्वरित बारा जागांसाठी झालेल्या निवडणुकीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत. धरमचंद बागरेचा, सुनील बंब, अतुल काले, सुनील कंगले, डॉ. विजयकुमार कोठारी, रवींद्र लोहाडे, सत्येन मुंदडा, कल्पेश शहा, राजेंद्र शिंगी, कैलास ठोळे, रतनचंद ठोळे, रवींद्र ठोळे, भटक्या विमुक्त जाती-जमातीतून वसंतराव आव्हाड. महिला राखीव जागांवर प्रतिभा शिलेदार, प्रभावती दीपक पांडे, इतर मागासवर्गीय जागेवर हेमंत बोरावके, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून यशवंत आबनावे हे पूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक ई. पी. पाटील यांनी काम पाहिले.
सन १९४८ मध्ये स्थापन झालेल्या या बँकेत १९४ कोटी रुपयांच्या ठेवी असून १०५ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. सभासदांनी दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून बँकेच्या अधिकाधिक प्रगतीसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन बँकेचे ज्येष्ठ संचालक रतनचंद ठोळे यांनी निकालानंतर दिले.