देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विविध खबरदारीचे उपाय सरकारी आणि संस्थात्मक पातळीवर केले जात आहेत. त्यानुसार, ख्रिश्चन समुदायाने देखील प्रार्थनेसाठी चर्चमध्ये एकत्र येताना कशा प्रकारे खबरदारी घ्यावी याची काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. पुणे धर्मप्रांताचे बिशप थॉमस डाबरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे या संदर्भात आवाहन केले आहे.

बिशप डाबरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. ते म्हणतात, आमच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या आणि धर्मगुरुंच्या सल्ल्यानुसार, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत.

या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, चर्चमध्ये प्रवेश करताना बाहेर पुरवण्यात आलेल्या सॅनिटायझरचा वापर करावा. त्याचबरोबर चर्चमधील येशूच्या प्रतिमेला किंवा पवित्र क्रॉसला चुंबन किंवा स्पर्श करणे टाळावे. हस्तांदोलन करणे, मिठी मारणे या गोष्टीही टाळाव्यात त्याऐवजी हात जोडून एकमेकांना अभिवादन करावे. त्याचबरोबर प्रार्थनेदरम्यान पवित्र पाणी ठेवले जाणार नाही, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

त्याचबरोबर आजारपणात किंवा इतर वेळी धर्मगुरुंचा कपाळावर आणि हातात हात देऊन आशीर्वाद देताना स्पर्श टाळावा. गुड फ्रायडेच्या दिवशी चर्चमध्ये क्रॉसचे चुंबन किंवा स्पर्श करण्याचे टाळावे. तसेच चर्चमध्ये प्रवेश करण्यापूर्वी धर्मगुरुंसह सर्वंच भाविकांनी सॅनिटायझरने हात स्वच्छ केले पाहिजेत, असेही या पत्रकात म्हटले आहे.