जिल्हा परिषद सभेत खडाजंगी; अध्यक्ष व प्रशासन लक्ष्य

नगर : जिल्ह्यच्या ग्रामीण भागात लसीकरणावरून सुरू असलेल्या गोंधळात आज, सोमवारी जिल्हा परिषदेत राजकीय वाद रंगले. या वादातून काँग्रेस नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात समर्थक व भाजप नेते, माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे समर्थक यांच्यात चांगलीच जुंपली. जिल्ह्यच्या ग्रामीण भागात ४५ लाख लोकसंख्या असताना लसीकरणाचा मात्रा कमी लोकसंख्या असूनही शहरात अधिक प्रमाणात उपलब्ध केल्या जात आहेत, असा आक्षेप सदस्यांनी सभेत केला. सभेत विविध कारणावरून विखे समर्थक राजेश परजणे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले व प्रशासनाला लक्ष्य करत धारेवर धरले.

तब्बल दीड वर्षांच्या कालावधीनंतर जिल्हा परिषदेची सभा ऑफलाइन पद्धतीने आज, सोमवारी झाली. यापूर्वी हीच सभा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु आता निर्बंध हटल्याने प्रत्यक्ष सभा व्हावी, यासाठी विशेषत: भाजपा सदस्य आग्रही होते. अखेर ही मागणी सत्ताधाऱ्यांना मान्य करावी लागली.

भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी लसीकरणावरून आरोग्य विभागावर आरोप केले. लसीकरणात गोंधळ सुरू आहे. संगमनेर, पाथर्डीमध्ये वायल चोरीला गेल्या. अकोल्यातील आदिवासी महादेव कोळी, ठाकर समाज लस घेण्यास तयार नाही. त्यांच्यामध्ये भीती व अपप्रचार होत आहे, लसीकरणात पारदर्शीपणा यावा असे ते म्हणाले. लसीकरण ग्रामीण भागात केवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात होत आहे. केंद्रांना १० ते १२ गावे जोडली असतात, त्यामुळे तेथे गर्दी होते. त्यामुळे उपकेंद्रात व गावोगाव लसीकरण करावे, अशी मागणी राजेश परजणे यांनी केली. जिल्हा परिषदेने १४ व्या वित्त आयोगातून अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वापरातील अनियमिततेकडे त्यांनी लक्ष वेधले.

परजणे यांच्या गावोगावी लसीकरण करावे या मागणीवर जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संदीप सांगळे  तसेच काही सदस्यांनी, आमच्या गटात गावोगाव लसीकरण सुरू असल्याचे स्पष्ट केले. मात्र परजणे व सुधाकर दंडवते यांनी कोपरगाव तालुक्यात केवळ आरोग्य केंद्रातच लसीकरण केले जात आहे, उपकेंद्रातील लसीकरणास परवानगी नसल्याचे तालुका आरोग्याधिकारी सांगतात, याकडे लक्ष वेधले. त्या वेळी काँग्रेस समर्थक मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे आदींनी आमच्या गटात गावोगाव लसीकरण सुरू असल्याचे स्पष्ट केले.

त्यास हरकत घेत परजणे यांनी या निर्णयाबद्दल सदस्य अंधारात आहेत, आपल्याला माहिती दिली गेली नाही, असा आरोप करत प्रशासन संगमनेर व कोपरगावमध्ये वेगवेगळा न्याय दाखवून दुजाभाव करत आहे, मंत्र्यांचा तालुका म्हणून संगमनेरमध्ये विशेष न्याय दिला जात आहे का, असाही प्रश्न केला. कोपरगावमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांचा जावई, लेक, भाऊ असूनही दुजाभाव दाखवला जात आहे, असाही टोला त्यांनी लगावला. परजणे यांनी काँग्रेसचे मंत्री थोरात यांचा संदर्भ देताच थोरात समर्थक सीताराम राऊत, कानवडे, कातोरे, अजय फटांगरे हे परजणे यांच्यावर तुटून पडले. यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी रंगली. थोरात यांच्यामुळेच लसीकरण सुरळीत आहे, त्यामुळे त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करावा, असा उल्लेख कातोरे यांनी करताच, परजणे  यांनी त्याला आक्षेप घेतला, ती त्यांची नैतिक जबाबदारी आहे, त्यासाठीच लोकांनी त्यांना निवडून दिले, त्याबद्दल अभिनंदनाचा ठराव कशासाठी, असा टोला त्यांनी लगावला. थोरात केवळ संगमनेरचे नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत, असे कातोरे म्हणाले. फटांगरे यांनीही थोरात यांचा उल्लेख योग्य पद्धतीने होत नसल्याचा आक्षेप घेतला. पंतप्रधान, केंद्र सरकारने लस मात्रांचा सुरळीत पुरवठा केला तर नागरिकांना दिलासा मिळेल, असा टोला लगावला. त्यावर शिवसेनेचे संदेश कार्ले यांनी नगर तालुक्यात आम्ही नियोजन करून गावोगाव लसीकरण सुरू केल्याचे उदाहरण दिले.

याच वादातून सभापती सुनील गडाख यांनी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सांगळे यांना सदस्य माहिती विचारत असताना योग्य पद्धतीने उत्तर द्या, असे सुनावले. मात्र थोरात समर्थकांनी डॉ. सांगळे यांची बाजू घेत त्यांनी योग्य माहिती दिल्याचा प्रतिटोला लगावला.

डीपीसीच्या ७४ कोटीच्या खर्चाबद्दल आक्षेप

राज्य सरकारने जिल्हा नियोजनचा ३० टक्के निधी करोना उपाययोजनावर खर्च करण्याचे आदेश दिले आहेत, मात्र हा निधी कुठे खर्च झाला, याबद्दल गौडबंगाल निर्माण झाले आहे. करोना काळजी केंद्रांनाही निधी मिळालेला नाही, जिल्हा प्रशासनाने हा ७४ कोटी रुपयांचा निधी कोठे वापरला याचे उत्तर मिळत नाही, असे हरकतीचे मुद्दे जालिंदर वाकचौरे यांनी उपस्थित केले. त्यावर अर्थ समितीचे सभापती सुनील गडाख यांनी हा निधी जिल्हा परिषदेचा असतानाही तो राज्य सरकार खर्च करत आहे, हा निधी खर्च करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेला द्यावेत, अशा मागणीचा ठराव सभेत केला.