कलम ३७० रद्द करणाऱ्यांनी कलम ३७१ चं काय करणार ते सांगावं – शरद पवार

कलम ३७० वरुन लोकांना फसवण्याचे काम भाजपा करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. नागपूर जिल्ह्यात प्रचारसभेत ते बोलत होते.

संग्रहित

आजही लोक पुलवामा, कलम ३७० वर मतं मागत आहेत. भाजपा आम्हाला विचारत आहे की, ३७० वर राष्ट्रवादीची भूमिका काय? लोकसभेत सरकारच्या या निर्णयाला काहीजणांनी विरोध केला. मात्र, त्यांच्या विरोधाला न जुमानता निर्णय घेतला गेला आणि आता त्यावर मतं मागितली जात आहेत. कलम ३७० रद्द करणाऱ्यांनी ३७१ चं काय करणार याचं उत्तर द्यावं. कारण, कलम ३७१ मुळं ईशान्य भारतातील जमिनी विकत घेता येत नाहीत, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भाजपाला केला आहे. कलम ३७० वरुन लोकांना फसवण्याचे काम भाजपा करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. नागपूर जिल्ह्यात प्रचारसभेत ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, काही लोक म्हणतात मोदींना लोकसभा निवडणुकीत मोठं यश आलं. पण हे यश कशाच्या जोरावर आलं? पुलवामा येथे काही गोष्टी घडल्या त्यामुळे सरकारने निर्णय घेतला. हा निर्णय काही एकट्या दुकट्याने घेतलेला नाही. सर्वपक्षीय नेत्यांनी हा निर्णय घेतला. भारतावर कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्यांना धडा शिकवायला हवा असा हा निर्णय होता. ही सगळी कामगिरी सैन्याने केली मात्र, सध्याच्या राज्यकर्त्यांनी त्याचं श्रेय आपल्याकडं घेतलं असाही आरोप शरद पवार यांनी केला.

बेरोजगारीची चिंता सरकारला नाही. सरकारला भलत्याच गोष्टींची चिंता आहे. कारखाने बंद झाले म्हणून अनेक लोकांचे रोजगार गेले आहेत. जेट एअरवेज कंपनी बंद पडली त्यामुळे २२ हजार तरुणांचा रोजगार गेला. सरकारने समन्वय साधायला हवा होता पण सरकारने ते केले नाही. सरकारच बेरोजगारीला जबाबदार आहे. महागाई वाढली आहे त्यामुळे जनतेवर दुहेरी संकट आहे, यालाही सरकारच जबाबदार असल्याचे पवार यावेळी म्हणाले.

पी. चिदंबरम यांना अटक झाली. आरोप खरे की खोटे माहिती नाही. पण जाणूनबुजून त्रास द्यायचा प्रयत्न सुरू आहे. ईडीची नोटीस बजावत मलाही संकटात आणण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकरणाशी माझं काहीही देणं घेणं नसताना माझ्यावर गुन्हा दाखल केला गेला. त्यामुळे मीच ठरवले ईडीच्या कार्यालयात जावून त्यांना हवी ती माहिती द्यावी. मी तिथे जाणार म्हणून सगळे खडबडून जागे झाले. सर्व यंत्रणा मला न जाण्यासाठी रोखू लागली. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मी तिथे न जाण्याचा निर्णय घेतला. हे लोक मला इतका त्रास देवू शकतात तर सामान्य माणसांना किती त्रास देतील याची कल्पना करा, असे सांगतना म्हणूनच आपल्याला या सरकारला सत्तेतून खाली उतरवायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

नागपूर क्राइम कॅपिटल म्हणून ओळखलं जातंय हे लाजीरवाणं

आज नागपूरच्या वर्तमानपत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोसहीत सरकारची जाहिरात आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक सरकारला पाच वर्षांत बांधता आले नाही. जलपूजन, भूमीपूजन झाले मात्र एक इंचभरही काम झालं नाही. दोन्ही स्मारकाबाबत शासन उदासीन आहे, असे शरद पवार यावेळी म्हणाले. नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. नागपूर शहर पूर्वी त्याच्या वैभवासाठी ओळखलं जायचं. मात्र, आज क्राईम कॅपिटल म्हणून ओळखलं जातंय. या नागपूरचं प्रतिनिधित्व फडणवीस करतात. ते राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीही आहेत. जर त्यांच्याच शहरात कायदा व सुव्यवस्था नसेल तर ही तुमची आमची बदनामी आहे, अशी टीकाही यावेळी शरद पवार यांनी केली.

राज्यात परिवर्तन करून तुम्हाला एक दिशा दाखवायची आहे. ज्याप्रमाणे छत्तीसगढ, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यातील लोकांनी भाजपाला परतवून लावले त्याच पद्धतीने महाराष्ट्रात आपल्याला भूमिका घ्यायची आहे, असे आवाहन पवारांनी यावेळी जनतेला केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Those who cancel section %e0%a5%a9%e0%a5%ad%e0%a5%a6 should tell what will be do about section 371 says sharad pawar aau

Next Story
लोकसभा निवडणूक निकालातून विधानसभेचा वेध
ताज्या बातम्या