scorecardresearch

“ओबीसी आरक्षणाला आम्ही विरोध केला म्हणणाऱ्यांना….”, धनंजय मुंडेंचा भाजपावर निशाणा

ओबीसी आरक्षणाचा खून महाविकास आघाडीने केला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्यानंतर धनंजय मुडेंनी प्रतिक्रिया दिली आहे

dhananjay munde

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक दोन आठवड्यात अधिसूचित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता या निवडणुका पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याची शक्यता आहे. यावरुन आता भाजपाने महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही याला प्रत्युत्तर दिले जात आहे.

मुंबई येथे भाजपा ओबीसी मोर्चाच्या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. आरक्षणाची जबाबदारी केंद्र सरकारची आहे असे म्हणतात. मग तुम्ही कशाला सरकारमध्ये आहात, द्या केंद्र सरकारच्या हातात द्या. ते सरकार चालवून ही दाखवेल आणि करुनही दाखवेल. तुम्हाला इथे वसुली करण्यासाठी निवडून दिले आहे का?,” असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. यावर आता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ओबीसी आरक्षणाविषयी कोणताही निर्णय न घेता महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे बाण चालवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे अशी टीका सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी जळगावमध्ये केली आहे.

“ओबीसी आरक्षणाला आम्ही विरोध केला किंवा हे सरकारचे अपयश आहे म्हणणाऱ्यांना खरंतर जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे. कारण ज्यांच्या विचारधारेतच आरक्षण नाही त्या विचारधारेने आम्हाला सांगावं की आम्ही ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहोत. माझं हे स्पष्ट मत आहे की मागच्या पाच वर्षांच्या काळात भाजपाच्या राज्यातील आणि केंद्रातील सरकारने आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात केस चालू होती त्यावेळी जो इम्पेरिकल डेटा देणं अपेक्षित होतं तो दिला गेला नाही. हा ओबीसींचा डेटा केंद्र सरकारने दिला नाही. त्यामुळे हे त्यांचं अपयश आहे. आज आम्हाला ते जबाबदार धरत आहेत. निकाल लागल्यानंतर ते आमच्यावर जबाबदारी टाकत आहेत हे चुकीचं आहे. लोकांचा बुद्धीभेद करणं ही भाजपाची पद्धत आहे आणि आत्ताही ते आरक्षणाच्या मुद्द्यावर तेच करत आहेत. भाजपाने आता महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेचा विश्वास पूर्णपणे गमावला आहे. त्यामुळे ओबीसी असेल किंवा इतर आरक्षणाचा विषय असेल, जातीपातीचं राजकारण, धर्मांमध्ये तेढ निर्माण करणं असेल काहीही केलं तरीही भाजपाला महाराष्ट्रातली जनता ओळखून आहे. त्यांना ही जनता कधीही खपवून घेणार नाही,” असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होत आहेत. अशा प्रकारची अवस्था असताना ही कार्यकारणीची बैठक होत आहे. ओबीसींचे आरक्षण हे गेले नसून त्याचा मुडदा पाडलेला आहे. राजकीय आरक्षणाचा खून महाविकास आघाडीने केला आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Those who say we opposed obc reservation should be ashamed dhananjay munde abn

ताज्या बातम्या