बिपिन देशपांडे

छत्रपती संभाजीनगर : मानवी हस्तक्षेपामुळे एक हजारांवर प्राणी प्रजाती व २० हजारांपेक्षा जास्त सपुष्प वनस्पती संकटात असल्याकडे अभ्यासकांनी लक्ष वेधले आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कंझव्र्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन) च्या अहवालाचा आधार घेऊन हा दावा करण्यात आला असून आजच्या (२२ मे) ‘आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिना’निमित्त परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी व्यापक उपाययोजनांची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

जैविक संसाधनांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जनजागृती करण्याच्या अनुषंगाने संयुक्त राष्ट्रसंघाने सन २००० पासून आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा करण्याचे ठरविले. जगाच्या २.४ टक्के भूभाग व्यापलेल्या आपल्या देशात जगातील ७ ते ८ टक्के विविध प्राणी-वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. यात ९१ हजार प्राणी-प्रजाती व ४५ हजार ५०० वनस्पती प्रजातींचा समावेश आहे. पृथ्वीवरील स्थान, हवामान, माती, जलस्रोत, सजीव आदी घटकांच्या परिणामामुळे जैवविविधतेत असमानता आढळते. ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्तीय प्रदेशाकडे जैवविविधता वाढत जाते. वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण व शहरीकरणांमुळे जैवविविधतचे प्रमाण घटत आहे. एखादी प्रजात नष्ट झाली तर पुनरुज्जीवन करणे अवघड जात असल्याचे अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास साखरे यांनी सांगितले.

जैवविविधता दिनविशेष

‘रेड लिस्ट’मध्ये वाढ : गंभीरपणे धोक्याच्या यादीत (रेड लिस्ट) असलेल्या प्राण्यांची संख्या २०११ साली ४७ होती. २०२१ साली ती ७३ वर पोहोचली आहे. यात ९ सस्तन प्राणी, १८ पक्षी, २६ सरपटणारे प्राणी अन् २० उभयचर प्राण्यांचा समावेश आहे. आययूसीएन ही संस्था अशी यादी १९६४ सालापासून प्रसिद्ध करीत आहे.

हिम बिबटय़ा, तांबडे अस्वल, भारतीय हत्ती, आशियाई सिंह, भारतीय गेंडा, बंगाली वाघ व भारतीय गिधाडे अशा काही प्राणी-पक्ष्यांच्या प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. व्यवस्थापन आणि जैवसंपदेचा उपयोग आरोग्यमय आयुष्यासाठी शाश्वत केला जावा. लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण यासोबतच जीवसृष्टी संरक्षणासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. – डॉ. विश्वास साखरे, जैवविविधता तज्ज्ञ