स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसदरासाठी अधिकच आक्रमक झाली असून संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आयोजित केलेल्या ठिय्या आंदोलनाला रविवारी हजारो शेतकरी उपस्थित होते. या लढाईत राज्यकर्ते व साखर कारखानदारांचा नैतिक पराभव झाला असून, शेतकऱ्यांनी ऊसतोड देऊ नये, त्यांना न्याय निश्चित मिळणार असल्याचा ठाम विश्वास राजू शेट्टी यांनी दिला. या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर आज, सोमवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड दौऱ्यासाठी अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच सांगली जिल्हा ३० नोव्हेंबपर्यंत अशांत जिल्हा म्हणून जिल्हाधिकाऱ्यानी जाहीर केला आहे.
ऊसदरासाठी आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवरच ‘कराड बंद’ची हाक दिली आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथिनिमित्ताने मुख्यमंत्री सोमवारी येथे येत आहेत.  ‘स्वाभिमानी’तर्फे कराड येथे ठिय्या आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु, प्रशासनाने आंदोलनासाठी कराडपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावरील पाचवडेश्वर मंदिर परिसरातील जागा दिली आहे. मात्र तरीही रविवारी येथे हजारो ऊस उत्पादकांनी हजेरी लावली. त्या वेळी आंदोलनकर्त्यांसमोर राजू शेट्टी ऊस दराची भूमिका मांडताना, शासन व साखर कारखानदारांवर घणाघाती टीका केली.
‘आडमुठी भूमिका नाही’
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आडमुठी भूमिका नसून, चर्चेचे दरवाजे खुले आहेत. ऊस दराचा प्रश्न शेतकऱ्यांच्या हिताचा विचार होऊन लवकरात लवकर सुटावा. कराड दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक चर्चेचा निरोप पाठवल्यास त्यांच्याशी चर्चेस तयार आहे. मंगळवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भेटीसाठी जाणाऱ्या शिष्टमंडळाने सन्मानपूर्वक येण्याची विनंती केल्यास पंतप्रधानांच्या भेटीलाही जाऊ, अशी सविस्तर भूमिका राजू शेट्टी यांनी रविवारी मांडली.