पुण्यात हजारो महिलांनी दगडूशेठ अथर्वशीर्ष पठण केल्याची बातमी मी वाचली. आनंदाची आणि समाधानाची बाब आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर महिलांनी अथर्वशीर्ष म्हटलं मात्र रस्त्याच्या पलिकडे असलेल्या भिडेवाड्यात जिथे सावित्रीबाईंनी पहिली शाळा सुरु केली तिथे कुणाला जावसं वाटलं नाही, नतमस्तक व्हावं असं वाटलं नाही, ज्यांच्यामुळे मुली, महिला शिकल्या त्यांचा विसर त्यांना पडला असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या मनातली खंत बोलून दाखवली. नाशिकमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. काय म्हणाले छगन भुजबळ? "कर्मकांड किंवा अंधश्रद्धा याबद्दल विचार केला तर मी इतकंच सांगेन की दलित समाज बराचसा अंधश्रद्धा आणि कर्मकांडापासून बाहेर आलेला दिसतो आहे. ब्राह्मण समाजाला कर्मकांड माहित आहे. त्यांची वेगळी पद्धत आहे. अंधश्रद्धा आणि कर्मकांडामध्ये जर कुणी गुंतलं असेल तर तो ओबीसी समाज आहे. परवाच्या दिवशी मी पेपरमध्ये वाचलं. काहीतरी २५ हजार महिला अथर्वशीर्ष म्हणण्यासाठी जमल्या होत्या. मी नेहमी म्हणतो त्याच रस्त्याच्या पलिकडे भिडेवाडा आहे. तिथे महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी सुरु केलेली शाळा आहे. पहिली मुलींची शाळा तिथे आहे. अथर्वशीर्ष म्हणणाऱ्या महिलांपैकी कुणीही तिथे जाऊन नतमस्तक होताना दिसलं नाही. सगळे विसरले, कर्मकांड मात्र अजूनही सुरु आहे." माझ्यावर किती टीका झाली तुम्हाला माहित आहे मी जेव्हा म्हटलं की शिक्षणाचे आमचे देव हे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील हे आहेत. केवढा मोठा वाद निर्माण झाला. समाज माध्यमांवर खूप टीका झाली. पूर्वी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंवर दोन-चार लोकांनी दगड मारले असतील. आता जे काही ट्रोलिंग होतं ते हजारोंच्या संख्येने होतं. आपल्याच मोबाईलवर आपल्याला वाईट शिव्या वाचायला मिळतात. ही पूर्वीपेक्षा वाईट परिस्थिती आहे. महिलांना शिक्षणाची कवाडं बंद होती, उच्चवर्णीय महिलांनाही शाळा बंद होती. मराठ्यांपासून दलितांपर्यंत सगळे क्षुद्र होते. उच्चवर्णीय फक्त तीन टक्के. त्यांनीच शिकायचं, तेदेखील पुरुषांनीच शिकायचं असा जेव्हा अलिखित नियम होता तेव्हा सावित्रीबाईंनी पहिली शाळा काढली. त्या शाळेत सहा मुली आल्या त्या ब्राह्मण समाजाच्या होत्या. आज मात्र त्यांचा विसर पडला आहे. जास्तीत जास्त अंधश्रद्धेच्या मागे अजूनही आपण जात आहोत. जुन्या रुढी परंपरांमध्ये गुरफटलो आहोत. सत्यशोधक समाजाचं काम मागे पडलं आहे असंही छगन भुजबळ म्हणाले. अंधश्रद्धेच्या विरोधात लढणाऱ्या नरेंद्र दाभोलकर यांना जीव गमवावा लागला. गोविंद पानसरेंची हत्या झाली, गौरी लंकेश यांची हत्या झाली. महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आणला, मात्र त्या कायद्याचाही काही उपयोग होत नाही. उत्तर प्रदेशातल्या बागेश्वर महाराजांच्या प्रवचनाला पाच लाख लोक गेले होते. मला आश्चर्य वाटलं. मी अशी माणसं पाहिली आहेत. ज्यांना माईंड रिडिंग येतं ते असे खेळ करतात ते करुन दाखवल्यावर लाखो लोक त्यांच्या मागे जातात अशीही खंत भुजबळ यांनी बोलून दाखवली आहे. सत्यशोधक चळवळीचे संशोधक प्रा.हरी नरके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सत्यशोधक समाजाचे ४१ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन जेजुरकर लॉन्स नाशिक येथे पार पडले. या अधिवेशनाच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी छगन भुजबळ बोलत होते.