नागपूर : काँग्रेस पक्षाचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या नावाने धमकावत दोघांनी नागपूर शहर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला एक कोटीची लाच मागितली. या लाचेतील २५ लाख रुपये घेताना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. दिलीप खोडे (५०, एमआयडीसी टेक्निशियन, अमरावती) आणि शेखर भोयर (रा. अमरावती) अशी लाचखोरांची नावे आहेत. आरटीओतील एका महिला अधिकाऱ्याने नागपूर शहर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार केली होती. या प्रकरणात काँग्रेसचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी १७ मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आरटीओवर कारवाईची मागणी केली होती. दिलीप खोडे (रा. ठाणे) आणि शेखर भोयर यांनी आमदार मिर्झा यांचे नाव वापरून आरटीओशी संपर्क साधला. हे प्रकरण विधान परिषदेत उपस्थित करण्याची धमकी देऊन अडचणीत यायचे नसेल तर एक कोटी रुपयांची मागणी केली. आरटीओ अधिकाऱ्याने ‘एसीबी’कडे तक्रार केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २५ लाख रुपये देण्याचे ठरले. सोमवारी ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी नागपुरात सापळा रचला व खोडे आणि भोयर यांना लाच घेताना रंगेहात पकडले. हेही वाचा - अमरावती महापालिकेचे ८५० कोटींचे अंदाजपत्रक सादर; कोणतीही करवाढ नाही; सरकारी अनुदानावर भिस्त आमदार मिर्झांची चौकशी होणार? लैंगिक छळ प्रकरणात आ. मिर्झा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १७ मार्चला पत्र लिहून आरटीओवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर लगेच एक कोटीच्या लाचेचे प्रकरण पुढे आले. त्यामुळे या दोन्ही आरोपींचा मिर्झांशी संबंध काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणात एसीबीकडून मिर्झा यांची चौकशी होणार आहे. चौकशीअंतीच सत्य समोर येईल आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या नावाचा वापर करून दिलीप खोडे आणि शेखर भोयर यांनी तक्रारदाराला लाच मागितली. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे. या गुन्ह्यात कुणाचा संबंध आहे, हे चौकशीअंतीच सांगता येईल, असे एसीबीचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर म्हणाले. हेही वाचा - ३० मार्च ते ६ एप्रिलदरम्यान ‘सावरकर गौरव यात्रा’ माझा काही संबंध नाही वृत्तपत्रांच्या माध्यमातूनच मला याबाबत माहिती मिळाली. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. मी दिलीप खोडे याला ओळखतच नाही. लोकप्रतिनिधी म्हणून नागपूर आरटीओविरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. यावर सभागृहात चर्चाही झाली, असे आमदार वजाहत मिर्झा म्हणाले.