माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या कुटुंबियांना धमकी देण्यात आल्याची घटना गेल्या महिन्यात समोर आली होती. आव्हाड यांची मुलगी आणि जावयावर गोळी झाडण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचं नाव समोर आलं. जितेंद्र आव्हाड यांनी यासंबंधी काही कथित ऑडियो क्लिपदेखील जारी केल्या आहेत. तसेच या प्रकरणी कारवाई व्हावी, यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
जितेंद्र आव्हाड यांच्या पाठपुराव्याला आता यश आलं आहे. कारण जितेंद्र आव्हाड धमकी प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे (गुन्हे अन्वेषण विभाग) सुपूर्द करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आव्हाड यांनी हा मुद्दा मांडला. त्यानंतर फडणवीस यांनी आव्हाड यांना आश्वस्त केलं.
हे ही वाचा >> “आजूबाजूच्या चमच्यांमुळे मुख्यमंत्री शिंदे त्रस्त”; जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली चिंता, म्हणाले, “मी त्यांना जवळून…”
काय म्हणाले फडणवीस?
फडणवीस म्हणाले की, “जितेंद्र आव्हाड यांनी एका अधिकाऱ्याच्या संदर्भातला विषय खूप पोटतिडकीने मांडला आहे. मी त्यांना आश्वस्त करू इच्छितो की, कोणत्याही परिस्थितीत लोकप्रितनिधी म्हणून तुम्ही, तुमची कन्या आणि तुमचं कुटुंब धोक्यात येणार नाही याची काळजी घेतली जाईल. म्हणूनच हे प्रकरण तपासासाठी मी सीआयडीकडे सुपूर्द करत आहे.”