टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेला तिरंदाज प्रवीण जाधवच्या कुटुंबीयांना शेजाऱ्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त सोमवारी समोर आले होते. सातारा जिल्ह्यातील सारडे येथील घराची दुरुस्ती करू नये, यासाठी जीवे मारण्याची धमकी प्रवीणच्या कुटुंबीयांना शेजाऱ्यांकडून देण्यात आली होती. भारतात परतल्यानंतर प्रवीणच्या आईने त्याला ही माहिती दिली. त्यानंतर प्रवीणने यासंबंधी प्रसारमाध्यमांना कळवले होते. गरीब कुटुंबातून येऊन देशपातळीवर देशाचे नाव झळकावणाऱ्या प्रवीण जाधवच्या कुटुंबियांवर अशी वेळ आल्याने हे कुटुंब बारामतीला कायमच स्थाईक होण्याच्या तयारीत आहे.

‘‘पाच ते सहा जणांनी आज सकाळी माझ्या घरात प्रवेश करत कुटुंबीयांना घराची दुरुस्ती करू नये, असे बजावले. यापूर्वीही अनेकदा त्यांनी माझ्या कुटुंबीयांना त्रास दिला आहे. मात्र यावेळी त्यांनी जीवितहानी करण्याची धमकी दिल्यामुळे मला यासंबंधी अधिकृत तक्रार नोंदवावी लागत आहे. आमच्या घराची दुरुस्ती रोखण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही,’’ असे प्रवीणने सांगितले होते.

टोक्योतून माघारी परतल्यानंतर प्रवीण थेट हरयाणा येथे रवाना झाला आहे. कारण पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेसाठी हरयाणात भारतीय खेळाडूंचे सराव शिबीर होणार आहे.

प्रवीण जाधवचे कुटुंब अद्यापही एका साध्या घरात राहत आहे. प्रवीण आणि त्यांच्या आई वडिलांनी पक्कं घर बांधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दोन्ही वेळेला घरामागे जमीन असलेल्या बेतार बंधूंनी त्यांना विरोध दर्शवला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी यावरुन  जाधव आणि बेतार कुटुंबामध्ये वाद झाला होता. यासर्व प्रकाराची माहिती फलटण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ नितिन सावंत यांना समजल्यानंतर त्यांनी गावात जाऊन दोन गाव गुंडांना बरड ओपी पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर त्यांनी आपण प्रविणच्या आईवडिलांना त्रास देणार नसल्याचे पोलिसांना लेखी स्वरुपात दिले. सावंत यांच्या सोबत फोनवर संपर्क साधल्यानंतर हा वाद संपुष्टात आला असल्याचे त्यांनी सांगितले होते.

“ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रवीणच्या कुटुंबियांना काय मदत करता येईल ते पाहिले जाईल. गाव सोडून जायच्या बाबतीत तो प्रश्न त्यांनी गावपातळीवर मिटवला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाद मिटवून टाकण्याचे आदेश दिले आहेत. मला स्वतःला खेळामध्ये आवड असल्याने मी यामध्ये विशेष प्रयत्न करणार  आहे यात काही शंका नाही,” अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी एबीपी माझासोबत बोलताना दिली आहे.