नगर : पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे रविवारी (दि. २४) एकाच दिवशी तीन बालविवाह झाल्याचे उघडकीस आले आहे. चाइल्ड लाइन संस्थेने या घटनेकडे लक्ष वेधल्यानंतर पाथर्डी पोलिसांनी वर व वधूचे आईवडील, जवळचे नातेवाईक, पुरोहित, आचारी, मंडपवाले अशा एकूण ३३ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

गेल्याच आठवड्यात पाथर्डीत बालविवाह झाल्याचा एक गुन्हा दाखल झालेला आहे. चाइल्ड लाइन संस्थेच्या निरीक्षणानुसार ऊस तोडणी कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर बालविवाह घडून येत आहेत. करोना प्रतिबंधक टाळेमंदीच्या काळातही या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.

चाइल्ड लाइन संस्थेला पाथर्डीतील एकनाथवाडी येथे रविवारी तीन बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी ही घटना एकनाथवाडीचे ग्रामसेवक भगवान भिवसेन खेडकर यांना कळवली. खेडकर यांनी घटनेची खात्री करण्यासाठी गावात भेट दिली. मात्र वºहाडींनी त्यांना माहिती दिली नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे काल, सोमवारी खेडकर यांनी मुलींच्या संबंधित शाळेत, आव्हाळवाडी (शिरूर कासार, बीड) व एकनाथवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन मुलींच्या वयाची खात्री केली. तिन्ही मुलींचे वय १४ वर्षे ३ महिने होते. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम ९, १०, ११ अन्वये फिर्याद दाखल केली.

एका गुन्ह्यात १० दुसऱ्या गुन्ह्यात १२ व तिसऱ्या गुन्ह्यात ११ आरोपींचा समावेश आहे. दोन मुली एकनाथवाडी येथील आहेत तर एक मुलगी आव्हाळवाडी येथील आहे. आव्हाळवाडी येथील मुलीचा विवाहही एकनाथवाडीमध्येच आयोजित करण्यात आला होता. पाथर्डी तालुक्यात यापूर्वीही एका अल्पवयीन मुलीचा दोनदा बालविवाह उघडण्याचा प्रकारही उघडकीस आला.

बालविवाहाबद्दल ग्रामसेवकच अनभिज्ञ

एकनाथवाडी येथे झालेले तीन बालविवाह, एक गावातील श्रीकृष्ण मंदिराच्या सभागृहात, दुसरा मुलीच्या घरासमोर तर तिसरा मुलाच्या घरासमोर आयोजित करण्यात आला होता. मंगल कार्यालय भाड्याने घेऊन आयोजित केलेले विवाह सरकारी यंत्रणेच्या निदर्शनास येतात. त्यामुळे दुर्गम भागात घरासमोर मंडप टाकून किंवा गावातील मंदिरातच आयोजित बालविवाह आयोजित केले जात आहेत. त्यामुळे ते बहुसंख्य वेळा सरकारी यंत्रणेच्या निदर्शनास येत नाहीत. सरकारी यंत्रणेला ही माहिती मिळाली नसली तरी चाइल्ड लाइन संस्थेला मात्र ही माहिती मिळू शकली. त्यामुळे यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. फिर्याद देणारे ग्रामसेवक एकनाथवाडीचेच आहेत. परंतु त्यांनाही चाइल्ड लाइन संस्थेने माहिती दिल्यानंतरच जाग आली. गाव पातळीवर ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहेत.