चंद्रपूर-नागपूर महामार्गावर अपघात, तीन जण ठार

समोरचे चाक अचानक निघाल्याने कार झाडावर आदळली

चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर महामार्गावर कारच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू.

भरधाव वेगात असताना समोरचे चाक अचानक निखळल्याने नियंत्रण गमावलेल्या कारने झाडाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी ३.३० वाजता ही घटना घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, सिद्देश पंढरीनाथ प्रभुसाळगावकर (वय ३६, रा. तळवणे, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग), सुनीलकुमार अग्रवाल (वय ४०, मूळ रा. भरतपूर, राजस्थान, सध्या चंद्रपूर) आणि दशरथ पट्टे (वय ४५, रा. चंद्रपूर) यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. हे तिघेही रविवारी नागपूर येथून चंद्रपूरला येत होते. रस्त्यात अचानक गाडीचे चाक निखळल्याने हा अपघात झाला.

यातील सुनीलकुमार अग्रवाल हे चंद्रपूरमधील ताडाळी एमआयडीसीतील धारिवाल कंपनीत कार्यरत होते. अपघात घडला तेव्हा मांगली गावातील नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. परंतु, अपघातग्रस्तांना मदत न करता बघ्याची भूमिका घेऊन, घटनेचा व्हिडीओ करण्यात व्यस्त होते, असे सुत्रांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Three killed in road mishap on chandrapur nagpur highway aau