राहाता : जुन्या कौटुंबिक वादातून जावयाने सासुरवाडीत असलेल्या पत्नीसह इतर सहा जणांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पत्नी, मेहुणा, आजेसासू या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर सासू, सासरे आणि मेहुणी हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर आरोपी व त्याचा चुलत भाऊ हे दोघे मोटारसायकलवरून फरार झाले होते. दोन्ही आरोपींना पाच तासांत नाशिक जिल्ह्यात ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. ही घटना शिर्डीजवळील सावळीविहीर येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
हेही वाचा >>> “बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?




पत्नी वर्षां सुरेश निकम (वय २४), मेव्हणा रोहित चांगदेव गायकवाड (वय २६), आजेसासू हिराबाई धृपद गायकवाड (वय ७०) असे मृत्युमुखी पडले आहेत. संगीता चांगदेव गायकवाड (वय ४५), सासरे चांगदेव धृपद गायकवाड (वय ५५) व मेव्हणी योगिता महेंद्र जाधव,(वय ३०, सर्व राहणार विलासनगर, सावळीविहीर, तालुका राहाता) अशी जखमींची नावे आहेत. सुरेश उर्फ बाळू विलास निकम (वय ३२) व त्याचा चुलत भाऊ रोशन कैलास निकम (वय २६, दोघे रा. संगमनेर खुर्द) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
घडले काय?
आरोपी सुरेश उर्फ बाळू विलास निकम याचा पत्नी वर्षां हिच्याबरोबर नऊ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर पती सुरेश दारू पिऊन पत्नी वर्षां हिस सतत शिवीगाळ, मारहाण करत असे. या त्रासाला कंटाळून वर्षां आपल्या दोन मुलींना बरोबर घेऊन माहेरी राहत होती. यानंतर आरोपी सुरेश उर्फ बाळू विलास निकम याने सासुरवाडीला येऊन पत्नी आणि सासू यांना शिवीगाळ केल्यामुळे वर्षांने त्याच्याविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याचा मनात राग धरून सुरेश आणि त्याचा चुलत भाऊ दोघेजण बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सावळीविहीर येथील सासुरवाडी येथे आले. घराचा दरवाजा उघडताच या दोघांनी कुटुंबातील सहा जणांवर धारधार चाकूने वार करत तिघांची निर्घृणपणे हत्या केली.