नाशिक-पुणे राज्यमार्गावर संगमनेर तालुक्यात क-हे घाटाच्या पायथ्याशी दोन मालमोटारींमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात तिघे ठार व सहा जण जखमी झाले. जखमीपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.
मृतांपैकी एकाचीच ओळख पटली असून त्याचे नाव रणजितकुमार नवलभाई दोडी (राहणार गुजरात) असे आहे. या अपघातात महेश पटेल (वय ३२), राजेश पटेल (३५, दोघेही वापी, गुजरात), सोमनाथ थोरात (१७, बीड), विष्णू शिवाजी हतगले (४०, चाकण, पुणे), नथुराम बिष्णोई (२८) व सुभाष बिष्णोई (२८, दोघेही राजस्थान) असे सहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दोन्ही मालमोटारींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेनेच ही वाहने दूर अंतरावर जाऊन उलटी झाली. संगमनेर येथील राजहंस प्रकल्पातील वाहनाच्या चालकाने हा अपघात पाहिला. त्याच्यासह अन्य स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. मात्र यातील मृतांना बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला. याबाबत संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.