सांगली : शिराळा तालुक्यात बांबवडे येथील उसाच्या फडात मातेपासून दुरावलेली बिबट्याची तीन पिले बुधवारी मध्यरात्री मादीने नैसर्गिक अधिवासात नेल्यानंतर पिलांची घरवापसी मोहीम यशस्वी पार पडली. आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या तीन पिलांना नुकसान होउ नये यासाठी वन विभागाने जागता पहारा ठेवला होता.

सुनिल राउत (रा. टाकवे) यांच्या उसाची तोड करण्यात येत असताना मंगळवारी दुपारी उसतोड करणार्‍या कामगारांना बिबट्याची तीन पिले आढळली असल्याची माहिती भानुदास माने यांनी दिली. वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी जाउन पाहणी केली. ३० ते ३५ दिवस वयाचे एक मादी जातीचे तर दोन नर जातीची अशी तीन  पिले फडात आढळली होती. त्यांचे वजन दोन किलो, एक किलो ७०० ग्रॅम आणि १ किलो ४०० ग्रॅम होते. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वन क्षेत्रपाल महंतेश बगले, मानद वन्य जीव रक्षक अजित पाटील, वनपाल चंद्रकांत देशमुख,  देवकी ताशीलदार, प्रकाश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पशू वैद्यकीय अधिकारी सतिशकुमार जाधव व शुभांगी अरगडे यांनी त्यांची तपासणी केली असता सर्व पिले सुरक्षित असल्याचे सांगितले. आईपासून दुरावलेल्या पिलानां घेण्यासाठी रात्री मादी येणार हे ओळखून पिलांना प्लास्टिकच्या बकेटमध्ये ठेवण्यात आले. आईच्या कुशीत ही पिले जावीत यासाठी या परिसरावर कॅमेरातून नजर ठेवण्यात आली. रात्रीच्या अंधारात  पिलाच्या मागावर आलेल्या बिबट मादीने आपल्या जबड्यातून तीनही पिले नैसर्गिक अधिवासात नेली. त्यावेळी वन कर्मचार्‍यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. बिबट्याच्या पिलाची नैसर्गिक आणि मातेच्या मदतीने घरवापसी व्हावी यासाठी वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी उपवन संरक्षक नीता कट्टे, सहायक वन संरक्षक डॉ. अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम यशस्वी पार पाडली.