गावठी कट्टय़ाच्या खरेदी-विक्री प्रकरणात शिर्डीतील तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, २ जिवंत काडतुसे व एक मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. अटक करण्यात आलेला एक जण नगरमधील वसंतराव नाईक विकास महामंडळात कंत्राटी पद्धतीवर लिपिक म्हणून काम करतो. अन्य दोघे साईबाबा मंदिर परिसरात ‘पॉलिश’चा धंदा करतात.
तिघांनाही सोमवारी राहुरीत अटक करण्यात आली. राहुरी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील राहुल श्यामराव कुलकर्णी व साईनाथ अण्णासाहेब दिवे या दोघांकडे १८ वर्षे पूर्ण झाल्याचे, निवडणूक कार्यालयाचे ‘व्होटर कार्ड’ पोलिसांना आढळले. मंगळवारी तिघांना राहुरीतील न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यांच्या वकिलांनी जन्मतारखेचे दाखले सादर करत अल्पवयीन असल्याचा दावा केला. न्यायालयाने तिघांना बाल गुन्हेविषयक न्यायालयापुढे हजर करण्याचा आदेश दिला.
सहायक निरीक्षक सुनील टोणपे, मन्सूर सय्यद, प्रसाद भिंगारदिवे, जोसेफ साळवी, उमेश खेडकर, गोवर्धन कदम यांच्या पथकाने तिघांना अटक केली. या तिघांना नाशिकमधील एकाने गावठी कट्टा विक्रीसाठी दिला होता. राहुरी बसस्थानकासमोरील आदर्श ज्यूस सेंटर येथे ते आले होते, तेथेच त्यांना अटक करण्यात आली.