मुंबई : राज्यात परदेशातून आलेल्या प्रवाशांपैकी आणखी तीन जण बाधित असल्याचे शुक्रवारी आढळले आहे. राज्यात आत्तापर्यंत ३० जणांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविले आहेत.

राज्यात शुक्रवार सकाळपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ओमायक्रॉन बाधित देशातून आलेल्या २८२१ प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन प्रवासी बाधित असल्याचे आढळले. इतर देशांमधून आलेल्या ११,०६० प्रवाशांपैकी २२४ प्रवाशांची तपासणी करण्यात आली असून त्यातील एक प्रवासी बाधित आढळला आहे.

राज्यात आढळलेले बाधित प्रवासी आणि त्यांच्या सहवासितांपैकी १४ नमुने पुण्यातील एनआयव्ही येथे तर १६ नमुने कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत जनुकीय तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत.

राज्यात ६६४ नवे रुग्ण

मुंबई: ओमायक्रॉनचे संकट उभे ठाकले असले तरी राज्यातील करोनाच्या रुग्णसंख्येत घट होऊ लागली आहे. दिवसभरात ६६४ नव्या रुग्णांचे निदान झाले. विदर्भ, मराठवाडय़ात तर नव्या रुग्णांचे प्रमाण नगण्य होते.

गेल्या २४ तासांत  पुणे जिल्हा १६८, ठाणे जिल्हा १२०, नगर जिल्हा ३७ नव्या रुग्णांचे निदान झाले. गेले काही महिने नगर जिल्ह्यात रुग्णसंख्या जास्त होती. पण या जिल्ह्यातील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. कोकणात रायगड जिल्ह्य़ात ३०, रत्नागिरी जिल्ह्यात दोन तर सिंधुदुर्गमध्ये एकही नवा रुग्ण आढळला नाही. मराठवाडय़ात २९ तर विदर्भात फक्त ११ नवे रुग्ण आढळले.

मालेगाव, धुळे, नंदुरबार, सांगली, सिंधुदुर्ग, िहगोली, परभणी, लातूर, अकोला, अमरावती शहर, वाशीम, नागपूर जिल्हा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये दिवसभरात नवीन रुग्णांची नोंद झाली नाही.  मुंबईत शुक्रवारी १८६ रुग्ण नव्याने बाधित झाल्याचे आढळले असून तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.