नगर अर्बन बँक निवडणुकीतील तिघांचे उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरले. संचालकांच्या १८ जागांसाठी ८० इच्छुक रिंगणात राहिले आहेत. अर्ज अवैध ठरलेल्यांमध्ये बँकेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पाचरणे यांचा समावेश आहे.
बँकेची निवडणूक दि. ७ डिसेंबरला होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत ८३ जणांनी १४६ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी या अर्जाची छाननी झाली. त्यात तिघांचे अर्ज अवैध ठरल्याने आता ८० उमेदवार रिंगणात आहेत. येत्या दि. २२ पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
पाचरणे यांनी बँकेतील सत्ताधारी सहकार पॅनेलकडून अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांच्याकडे जातपडताळणी प्रमाणपत्र नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला. शाखा मतदारसंघातून सुनील कुलकर्णी (राहुरी) व सोपान पंडित (नेवासे) या दोघांचे अर्ज अवैध ठरले.
उमेदवार जाहीर नाहीत
उमेदवारी अर्जाची छाननी झाली असली तरी या निवडणुकीतील दोन्ही प्रमुख पॅनेलने अद्यापि त्यांचे उमेदवार अधिकृतरीत्या जाहीर केलेले नाहीत. सत्ताधारी सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार निश्चित आहेत, मात्र त्यांनी व विरोधी जनसेवा मंडळानेही अधिकृतरीत्या उमेदवार जाहीर केलेले नाही. या दोन्ही प्रमुख प्रतिस्पर्ध्यांचे उमेदवार बहुधा गुरुवारी अधिकृतरीत्या जाहीर होतील, असे समजते.
अभय आगरकर प्रचारप्रमुख!
विरोधी जनसेवा मंडळाचे विद्यमान संचालक तथा भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी यंदा थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. मात्र ते या मंडळाचे प्रचारप्रमुख म्हणून कार्यरत राहणार आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये ते विरोधी गटाकडूनच बँकेत विजयी झाले होते.