कराड : पुणे- बंगळूरू महामार्गावर बंद पडलेली मोटार क्रेनला जोडून दुरुस्तीसाठी घेऊन जात असताना पाठीमागून वेगात आलेल्या आराम बसने तिला ठोकरले. या अपघातात तीन जण जखमी झाले. मलकापूर (ता. कराड) गावच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत सचिन गणपत रवले (४०, रा. मालचौंडी ता. जावळी) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आराम बसचालक संतोष केशव माने (रा. सांगली) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अपघातात अंकिता सचिन रवले, वेदान्त सचिन रवले व प्रज्ञा राजेश कदम हे तिघे जण जखमी झाले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, सचिन रवले हे रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कणकवली येथून कुटुंबीयांसमवेत त्यांच्या मालचौंडी या गावी निघाले होते. गगनबावडा येथील घाटात आले असता, त्यांची मोटार (एमएच ११ डीडी ७७१४) बंद पडली. ती क्रेनला टोचन करून कराड येथील शोरूमला चालले होते. कोल्हापूर-सातारा लेनवरून कराडकडे येत असताना मध्यरात्री दीडच्या सुमारास डी मार्टजवळ मागून भरधाव आलेल्या आराम बसने मोटारीला मागून जोरदार धडक दिली. यामुळे मोटार क्रेनवर आदळली. यात कारच्या पुढील व मागच्या अशा दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले.
या अपघातात अंकिता सचिन रवले, वेदान्त सचिन रवले व प्रज्ञा राजेश कदम हे जखमी झाले आहेत. या वेळी तेथून जाणाऱ्या रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष विशाल पुस्तके यांनी जखमींना कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलीस तपास करीत आहेत.