scorecardresearch

मृद व जलसंधारण विभागाच्या तीन बड्या अधिकाऱ्यांना ५० लाखांची लाच घेताना अटक

न्यायालयाने ठोठावली ९ मे पर्यंत पोलीस कोठडी

(प्रातिनिधिक छायाचित्र)

चंद्रपूरमधील उपविभागीय जलसंधारण अधिकारी तथा प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे (४६) यांना ब्रम्हपुरी येथील त्यांच्या राहत्या घरी काल(मंगळवार) रात्री १० वाजता ५० लाख रूपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुद्देमालासह अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या लाच प्रकरणात थेट सहभागी असलेले नागपुरचे जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा प्रभारी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी कविजीत पाटील (४६) व मृद व जलसंधारण कार्यालय चंद्रपूरचे विभागीय लेखाधिकारी रोहीत गौतम (३५) या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान तिघांनाही चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता ९ मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

नागपुरातील एका बड्या कंत्राटदार असलेल्या तक्रारदाराने नागपूर व चंद्रपूर येथील मृद व जलसंधारण कार्यालय येथे कोल्हापूर बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे केलेल्या कामाचे बिल तथा वितरीत केलेल्या कामाच्या बिलाकरिता आणि उर्वरित बंधाऱ्यांच्या कामाची रक्कम वितरीत करण्याकरिता मृद व जलसंधारण विभागाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी कवीजीत पाटील, चंद्रपूरचे जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे तथा विभागीय लेखाधिकारी रोहीत गौतम यांनी संयुक्तपणे ८१ लाख २ हजार ५३६ रूपयांची लाच मागीतली. इतक्या मोठ्या रकमेची लाच देण्याची तयारी नसल्याने कंत्राटदार तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणाची तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीच्या आधारावर प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. त्यानुसार चंद्रपूरचे जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे यांना रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास त्यांच्या ब्रम्हपुरी येथील निवासस्थानी ५० लाखांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुरच्या उपअधिक्षक अनामिका मिर्झापुरे व पथकाने मुद्देमालासह पंचासमक्ष अटक केली.

याच वेळी नागपूर व चंद्रपूर येथे संयुक्त कारवाई करतांना कवीजीत पाटील व विभागीय लेखाधिकारी रोहीत गौतम यांनाही अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. नागपूर व चंद्रपूर येथे अनुक्रमे पोलीस निरीक्षक सारंग मिराशी, पोलिस निरीक्षक सचिन मत्ते, पोलीस निरीक्षक प्रवीण लाके,पोलिस निरीक्षक जितेंद्र गुरूनुले व पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. या अटकेनंतर पाटील, शेंडे व गौतम या तिघांच्याही घराची झडती घेण्यात आली.

दरम्यान, गुन्हा दाखल केल्यानंतर आज सायंकाळ या तिघांनाही चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता ९ मे पर्यंत पोलीस कोठडीत मिळाली असल्याची माहिती उपअधिक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. लाच प्रकरणी अटकेनंतर या तिघांच्याही घराची तपासणी करण्यात आली आहे.

सर्वेक्षणाची ३ कोटींची काम –

प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे येथे रूजू झाल्यापासून कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या सर्वेक्षणाची तीन कोटींची कामे केल्याची माहिती समोर आली आहे. इतक्या कमी वेळात कोट्यावधीची कामे केल्या गेली त्यानंतर या कामांच्या बिलांसाठीही मोठ्या प्रमाणात नियमित देवाण घेवाण सुरू होती. यावेळी अधिकची रक्कम मागितल्यामुळेच प्रतिबंधक विभागाकडे ही तक्रार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या जिल्ह्यात मागील तीन दिवसांत राजुरा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा रायटर व वाहन चालक यांना ५० हजाराची लाच स्विकारतांना व २ लाख ६० हजार रूपये मोटरसायकलच्या डिक्कीत मिळाले. तर आता मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना ५० लाखाची लाच घेतांना अटक केली. येथील अधिकारी इतक्या मोठ्या प्रमाणात लाच घेत आहेत. या लाचेच्या रकमेच अधिकाऱ्यांचाच हिस्सा असतो की अन्यही सहभागी असतात याची चर्चा सुरू झाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three senior officials of soil and water conservation department arrested for accepting bribe of rs 50 lakh msr

ताज्या बातम्या