नगर-पुणे राज्यमार्गावर वाडेगव्हाण शिवारात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सुमारे तीन वर्षे वयाचा बिबटय़ा जागीच ठार झाला. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
नगर-पुणे राज्यमार्गावरील वाडेगव्हाण शिवारात बिबटय़ाचा संचार होता. गेल्या काही दिवसांपासून तो तेथील नागरिकांच्या निदर्शनास येत होता. त्याविषयी नागरिकांनी वन खात्यासही कळवले होते. परंतु त्याच्याकडून हल्ला झाला नसल्याने सरकारी नियमाप्रमाणे त्याला ताब्यात घेता येत नव्हते. हा बिबटय़ा गुरुवारी रात्री या परिसरात भक्ष्याचा शोध घेत असताना थेट नगर-पुणे या वर्दळीच्या राज्यमार्गावरच आला. वाहनांच्या प्रखर दिव्यांमुळे तो गोंधळून गेला असावा, असा अंदाज व्यक्त होतो. बावरलेल्या अवस्थेत तो सैरभैर झाल्यानंतर एका वाहनाने त्यास जोरदार धडक दिली. त्यात त्याच्या तोंडाला जबर दुखापत होऊन तो जागीच गतप्राण झाला.
या राज्यमार्गावर गस्त घालणाऱ्या सुपे (ता. पारनेर) पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी हा मृतावस्थेत पडलेला बिबटय़ा पाहिल्यावर वन खात्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत कोकाटे यांना कळवले. त्यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तेथे मृत बिबटय़ाचा पंचनामा करण्यात येऊन शुक्रवारी सकाळी पारनेर येथील लघुपशुचिकित्सालयात शवविच्छेदन करण्यात आले. नंतर त्याचे दफन करण्यात आले.