राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नावाचा वापर करुन कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या एका आरोपीला औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले. औरंगाबाद पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांची बदली आणि नियुक्ती प्रक्रियेसाठी ही पैशाची देवाण घेवाण केली जायची. या प्रकरणात सरकारी वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याचा संशय ही पोलिसांनी व्यक्त केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नावाने कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या भामट्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचे बनावट लेटरहेड बनवले होते. खुद्द रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली. ‘गणेश बोरसे असं या व्यक्तीचे नाव आहे. बोरसेने मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट लेटरहेड बनवले होते. त्यामुळे त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले,’ अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. ‘बोरसे विरोधात या अगोदर काही गुन्हे दाखल झाले आहेत. बनावट रासायनिक खताच्या विक्री प्रकरणी आणि नोकरभरती करण्याच्या संदर्भात त्याच्या विरोधात तक्रारी आहेत,’ असंही दानवेंनी सांगितले.