scorecardresearch

जंगलात फिरायला गेलेल्या प्रेमीयुगुलासोबत घडला अनर्थ; वाघाच्या हल्ल्यात प्रियकराचा जागीच मृत्यू

जंगल परिसरात दुचाकीवरून फिरायला गेलेल्या प्रेमीयुगुलावर वाघानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना गडचिरोली येथे घडली आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)

जंगल परिसरात दुचाकीवरून फिरायला गेलेल्या प्रेमीयुगुलावर वाघानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना गडचिरोली येथे घडली आहे. या हल्ल्यात प्रियकर तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर प्रेयसी तरुणी स्वत:चा जीव वाचवण्यात यशस्वी ठरली आहे. संबंधित घटना मंगळवारी दुपारी उसेगाव जंगल परिसरात घडली. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दीड ते दोन तास शोध मोहीम राबवल्यानंतर मृत तरुणाचा मृतदेह गावकऱ्यांना सापडला आहे.

अजित सोमेश्वर नाकाडे असं मृत पावलेल्या २१ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील रहिवासी होता. घटनेच्या दिवशी मंगळवारी तो आपल्या प्रेयसीला घेऊन उसेगाव जंगल परिसरात फिरायला गेला होता. दुचाकीवरून फिरत असताना दबा धरुन बसलेल्या वाघानं अचानक त्यांच्यावर हल्ला केला.

यावेळी वाघाने अजितला जंगल परिसरात ओढत नेलं. दुसरीकडे, अजितच्या मैत्रिणीनं घटनास्थळावरून पळ काढला आणि घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकरी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जंगल परिसरात शोध मोहीम राबवली. दीड ते दोन तास शोधाशोध केल्यानंतर अजितचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांनी जंगल परिसरात अशाप्रकारे फिरू नये, असं आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tiger attack on couple while roaming in forest area on bike young man died on the spot crime in gadchiroli rmm

ताज्या बातम्या