scorecardresearch

वाघाचा वृद्ध महिलेवर हल्ला; जीवाची बाजी लावून ७२ वर्षीय पतीने वाचवला पत्नीचा जीव

या महिलेच्या पतीने वाघाचा प्रतिकार करून आपल्या पत्नीला वाघाच्या तावडीतून सोडविले. मात्र वाघ पळून न जाता तिथेच बसून राहिला.

प्रातिनिधिक छायाचित्र (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)
  • विजय राऊत

मोखाडा तालुक्यात काल म्हणजेच १८ मार्च रोजी रात्री दहा वाजता वाघाने एका वृद्ध महिलेवर हल्ला केला. या वृद्ध महिलेच्या पतीने दाखवलेली समयसूचकता आणि धाडसामुळे या महिलेचे प्राण थोडक्यात बचावले. मात्र महिला गंभीर जखमी झाली आहे.

पोशेरा ग्रामपंचायत हद्दीतील पारध्याची मेट येथील शेतावर राहणाऱ्या काशिनाथ सापटे (वय ७२ वर्ष) व त्यांची पत्नी पार्वती सापटे वय (६५ वर्ष) हे रात्री झोपले असताना बाहेर कसला तरी आवाज आला. या आवाजाचे कारण बघायला पार्वती सापटे उठल्या आणि घराबाहेर पडताच अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरड केली.


त्यांचा आवाज आल्यावर त्यांचे पती काशिनाथ सापटे यांनी वाघाचा प्रतिकार करून आपल्या पत्नीला वाघाच्या तावडीतून सोडविले. मात्र वाघ पळून न जाता तिथेच बसून राहिला. हे पाहून या दोघांनी आरडाओरड केली, त्यांचा आवाज ऐकून पारध्याची मेट येथील ग्रामस्थांनी धाव घेऊन, वाघाला पिटाळून लावले. मात्र वाघ काही तासाने परत एकदा गावाकडे येताना ग्रामस्थांना दिसला.


यानंतर ग्रामस्थांनी फोनद्वारे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून स्थानिक तरुणांसोबत रात्रभर गस्त घातली. वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र निकम यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. वाघाच्या हल्ल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच ग्रामस्थांकडून पिंजरा लावण्याची मागणी केली जात आहे. हल्ल्यात जखमी महिलेवर नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tiger attacked on a old lady her 72 years old husband saved her by fighting with tiger vsk