वाघाचे कातडे विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपींना मध्यप्रदेश पोलिसांनी महाराष्ट्रात येऊन अटक केली. मात्र, या गंभीर गुन्ह्यात महाराष्ट्रात त्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याऐवजी, मेलेला वाघ कसा आमचा नाही हे सांगण्यातच महाराष्ट्र वनखात्यात अहमहमिका लागली आहे. त्यामुळे राज्याच्या वनखात्यातील अधिकाऱ्यांच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उजेडात आणल्यानंतर आता वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने हे प्रकरण हातात घेतले आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या पिटेझरीतील लाखनी फूड हाऊस रिसॉर्टचा मालक मधुकुमार मेघराजानी व साकोली येथील सुधाकर खाटवानी यांना लाखनी येथे येऊन मध्यप्रदेशातील बालाघाटच्या पोलिसांनी अटक केली होती. सुरुवातीला ही अटक महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर झाल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न झाला, पण नंतर हे बिंग फुटले. तब्बल बारा दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकरणात अद्यापही आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना चौकशीसाठी महाराष्ट्रात आणण्याची तसदी वनखात्याने घेतली नाही. अटक होताक्षणीच दुसऱ्या दिवशी मेघराजानी यांचे रिसॉर्ट सील करून त्याची चौकशी होणे गरजेचे असताना, अशी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित बाबींची आवरासावर करायला आरोपींच्या रिसॉर्टमधील कामगारांना वेळ मिळाला. या लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याऐवजी आरोपींच्या सुटकेसाठी गोंदियातून नामी वकिलांची फौज बालाघाटमध्ये दाखल झाली.
वनखात्यातीलच काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे रिसॉर्ट असलेली जागासुद्धा वनखात्याची असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या रिसॉर्टमध्ये नेहमीच वाघाच्या कातडीचे व्यवहार होत असून, दरवर्षी त्याच्याकडे नवीन कातडी येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रिसॉर्टच नव्हे तर आरोपीच्या मालकीचा पेट्रोल पंप सुद्धा आहे. त्यामुळे वनखात्यासोबत साटेलोटय़ाचा तर हा प्रकार नाही ना, असाही संशय आता व्यक्त करण्यात येत आहे. दोन महिन्यापूर्वी भंडाऱ्यात वाघाचे कातडे पकडण्यात आले. मात्र, अजूनही या प्रकरणात वनखात्याने चौकशी आणि तपासाची सूत्रे वेगाने हलवत कारवाई केली नाही. त्यामुळे आरोपी आपले, पण वाघ मात्र आमचा नाही ही वनखात्याची भूमिका वाघांच्या शिकारीसाठी कारणीभूत ठरणारी आहे.
आरोपीची पोलिसांसमोर कबुली
वाघाच्या ज्या कातडीसह आरोपीला अटक करण्यात आली, ते गेल्या तीन-चार महिन्यांपासून साकोलीतच फिरत होते. आरोपीने बालाघाट पोलिसांसमोर दिलेल्या बयाणात हे कबूल केले आहे. सुमारे नऊ लाख रुपये या कातडीवर उधळले गेले. अंधश्रद्धेपोटी साकोलीतीलच २०-२५ लोकांनी त्या कातडीचा वापर पूजेसाठी केला आणि आरोपीने त्यावर हे लाखो रुपये कमावले.