चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील मोखाळा—आल्फर मार्गावर गमन सरपाते यांच्या शेतातील विहिरीत रविवारी मध्यरात्री वाघ पडला. ही माहिती शेतमालकाने वनविभागाला दिली. पाहता—पाहता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळी मोठी गर्दी झाली. वनपरिक्षेत्र अधिकारी एम. पी. राठोड व त्यांची चमूही पोहचली. विहिरीतून वाघाला बाहेर काढण्यासाठी विहिरीत खाट सोडण्यात आली. अखेर वाघ खाटेवर बसला आणि  तब्बल पाच तासांच्या प्रयत्नानंतर त्याची सुटका झाली.

 विहिरीत वाघ असल्याचे कळताच ग्रामस्थांनी आधी विहिरीत दोर टाकून  पाहिला. परंतु वाघ दोरी कुरतडून टाकायचा. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी एम. पी. राठोड व पथकाने  विहिरीत खाट टाकली.

वाघ खाटेवर बसला आणि खाट विहिरीच्या काटावर येताच वाघाने उडी मारून शेतशिवरात पलायन केले. हा वाघ हा शिकारीच्या शोधात विहिरीत पडला असावा, असा अंदाज आहे.

वाघ सध्या शेतशिवरातच असल्यामुळे शेतकरी, शेतमजूर यांच्यात भीतीचे वातावरण आहे. वनविभागासमोरही वाघाला पकडण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.  वाघाला यशस्वीपणे विहिरीबाहेर काढण्याच्या मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांच्यासोबत अमोल नेवारे, किशोर देऊळकर, निबुद्धे, वनपाल रामटेके, एस.डी.वाटेकर, ईश्वर लाडके, स्वयंसेवी संस्था तथा वनमजूर व चौकीदार सहभागी झाले होते.