लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : करमाळा तालुक्यातील गटातटाचे राजकारण तापविणाऱ्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत चुरशीने मतदान झाले. सुमारे ६५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. दोन्ही गटांनी परस्परविरोधी बहुमताचे दावे केले आहेत.
करमाळा तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या आणि बंद पडलेल्या आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील यांच्यासह मोहिते-पाटील कुटुंबीय आणि माजी आमदार जयवंत जगताप यांच्या संजीवनी पॅनेलने ताकद पणाला लावली होती. तर त्यांच्या विरोधात अपक्ष माजी आमदार संजय शिंदे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे माढा विभाग जिल्हाप्रमुख महेश चिवटे आणि भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांना सोबत घेत आदिनाथ बचाव पॅनेलच्या माध्यमातून आव्हान दिले होते. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या नावाचा वापर झाला असला तरी त्यात दोन्ही गटाकडे ऐक्याचा अभाव दिसून आला. महायुतीचे अर्थात भाजपचे नेते, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे महाविकास आघाडीच्या बाजूने तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार यांच्या समर्थकांचे महायुतीला समर्थन होते. या कारखान्याचे कार्यक्षेत्र आमदार रोहित पवार यांच्या कर्जत विधानसभा मतदारसंघातही आहे.
प्रचाराची सांगता होण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दुपारी रखरखत्या उन्हात संथ गतीने मतदान झाले. त्यानंतर चुरस वाढली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६०.७९ टक्के मतदान झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिली. एकूण २९ हजार ४१ मतदारांपैकी एकूण ७२ मतदान केंद्रांवर १५ हजार २२४ पुरुष आणि २४३० महिला अशा एकूण १७ हजार ६५४ मतदारांनी ७२ मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला. शेवटच्या तासाभरात मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी वाढली होती. येत्या १९ एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.