सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यातील आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या तिलारी धरणातून कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक विसर्ग वाढवण्यात आल्याने घोटगेवाडी कॉझवेवरून छत्तीसगढ येथील एक कामगार आणि एक लहान मुलगा असे दोघे जण पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी जलसंपदा अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अंधार पडल्याने सोमवारी शोधमोहीम थांबवण्यात आली असून मंगळवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवण्यात येणार आहे.

​अनूरज्जन किसफुट्टा बिजीपानी (वय २७) आणि रेगण दिलीप बडा (वय ८, दोघे रा. छत्तीसगढ) अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत. ​मिळालेल्या माहितीनुसार, मोर्ले येथे कामासाठी आलेले हे मजूर कोनाळकट्टा येथे आले होते. त्यावेळी कॉझवेवरील पाण्याचा प्रवाह कमी होता. मात्र, कोनाळकट्टा येथून माघारी मोर्लेकडे पायी जात असताना धरणातून अचानक पाणी सोडल्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला. यामुळे हे दोघेही पाण्याच्या झोतात वाहून गेले. दरम्यान, नदीपात्रातील पाणी पाहण्यासाठी आलेल्या काही युवकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केल्यामुळे ही घटना तात्काळ उघडकीस आली, अन्यथा कामगार खोलीवर न पोहोचल्याने शोध सुरू करावा लागला असता.

​घटनेची माहिती मिळताच धरणातून पाण्याचा विसर्ग तातडीने बंद करण्यात आला. घटनेचे वृत्त पसरताच शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. पूर्वकल्पना न देता पाणी सोडल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ​घटनास्थळी दोडामार्ग पोलीस निरीक्षक पथकासह दाखल झाले आहेत. धरणाचे पाणी कमी करून प्राथमिक शोध घेण्यात आला, मात्र रात्री अंधार पडल्याने शोधकार्य थांबवावे लागले. मंगळवारी सकाळी प्रशासनाकडून व्यापक शोधमोहीम राबवली जाणार आहे.