​सावंतवाडी: महाराष्ट्र राज्याचे ‘ॲमेझॉन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि समृद्ध जैवविविधतेने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी खोऱ्यात पुन्हा एकदा दुर्मिळ ‘वनमानवा’चे (स्लेंडर लॉरिस / लाजवंती) दर्शन झाले आहे. शनिवारी रात्री दोडामार्ग येथील निसर्ग अभ्यासक नाईट ट्रेलसाठी गेले असता, त्यांना ‘लाजवंती’च्या एका जोडीचे प्रत्यक्ष दर्शन घडले. या अनपेक्षित दर्शनाने निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

​’स्लेंडर लॉरिस’ (शास्त्रीय नाव: Loris lydekkerianus) हा मुख्यत्वे दक्षिण भारत आणि श्रीलंकेतील घनदाट जंगलांत आढळणारा अतिशय दुर्मिळ व लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे. या प्राण्याची लांबी साधारण ५ ते १० इंच असून वजन २५० ते ३०० ग्रॅमच्या आसपास असते. याचे हात-पाय लांब व सडपातळ असतात आणि याला शेपटी नसते. मानवासारख्या दिसणाऱ्या शारीरिक वैशिष्ट्यांमुळेच स्थानिक भाषेत याला ‘वनमानव’ म्हटले जाते. हा पूर्णपणे निशाचर (Nocturnal) प्राणी असून रात्रीच्या वेळी अन्नाच्या शोधात बाहेर पडतो. लहान किडे, पक्ष्यांची अंडी, पाली आणि छोटे सरपटणारे प्राणी हे त्याचे मुख्य खाद्य आहे. हा प्राणी अतिशय शांत आणि लाजाळू स्वभावाचा असून झाडांवरच राहणे पसंत करतो. दोडामार्ग तालुक्यातील केर, मांगेली ते विर्डी या भागातील जंगलांमध्ये याची नोंद आढळते.

​भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत ‘स्लेंडर लॉरिस’ला Schedule I मध्ये समाविष्ट करण्यात आले असून त्याला सर्वोच्च कायदेशीर संरक्षण प्राप्त आहे. मात्र, सध्या वाढती वृक्षतोड, मानवी हस्तक्षेपामुळे अधिवासाचा होणारा ऱ्हास आणि अवैध तस्करी यामुळे या प्राण्याच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाले आहे.

​या पार्श्वभूमीवर बोलताना पर्यावरणप्रेमी उदय सातार्डेकर यांनी सांगितले की, तिलारी परिसरातील वाढती जंगलतोड ही येथील जैवविविधतेसाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. या हस्तक्षेपाला वेळेत आळा घालून दुर्मिळ वन्यजीवांचे रक्षण करणे गरजेचे आहे. तर पश्चिम घाटाचे अभ्यासक डॉ. माधव गाडगीळ यांनी सादर केलेल्या सविस्तर अहवालाचा अभ्यास करून केंद्र सरकारने पर्यावरण संवर्धनासाठी ठोस निर्णय घेतला, तरच येथील जैवविविधता टिकून राहील, असे मत डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले.