सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यात तिलारी खोऱ्यातील मानव-हत्ती संघर्ष कायमस्वरूपी आटोक्यात आणण्यासाठी आणि हत्तींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात स्थिर करण्यासाठी वन विभागाने तब्बल ६८६ कोटी २७ लाख ९३ हजार रुपयांचा ‘तिलारी हत्ती संवर्धन प्रकल्प’ प्रस्तावित केला आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळवून देण्यासाठी आमदार दीपक केसरकर प्रयत्नशील असून, वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे लवकरच हा प्रस्ताव सादरीकरणासाठी ठेवला जाणार आहे.

​वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाची अंमलबजावणी दोन टप्प्यांत करण्याचे नियोजन आहे.पहिल्या टप्प्यात २६ किलोमीटर अंतराचे रेल्वे बॅरिकेट्स उभारणे आणि हत्तींसाठी आवश्यक खाद्य उपलब्ध करून देणे या कामांचा समावेश आहे. यासाठी राज्य शासनाकडे पहिल्या टप्प्यातील निधीची मागणी केली जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात तिलारी धरण परिसरातील ३,७९३.७९ हेक्टर क्षेत्र हत्तींच्या नैसर्गिक अधिवासासाठी संपादित करून विकसित करण्याचे नियोजन आहे.
या ​प्रकल्पामुळे हत्तींचा मानवी वस्तीतील वावर रोखण्यास मदत होणार आहे.

​तिलारी खोऱ्यात हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त असून, शेती-बागायतीचे प्रचंड नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर हत्तींना मानवी वस्तीत येण्यापासून रोखण्यासाठी आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुरेसे अन्न-पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

​रेल्वे बॅरिकेट्सची रचना :

प्रस्तावानुसार उभारले जाणारे लोखंडी रेल्वे बॅरिकेट्स जमिनीवर २.९० मीटर उंच आणि १.५० मीटर खोल पाया असलेले असतील. या बॅरिकेट्सचे आयुष्यमान सुमारे ३० वर्षांपेक्षा जास्त असू शकते. बॅरिकेट्स उभारणीसाठी प्रति किलोमीटर सुमारे १ कोटी ८२ लाख २४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. हत्तींना पुरेसे खाद्य उपलब्ध व्हावे म्हणून बांबू, केळी, गवत, फणस व इतर खाद्य वनस्पतींची लागवड केली जाणार आहे. अधिवास विकासासाठी २०५ कोटी ५५ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे.

हत्तींना स्वतंत्र आणि सुरक्षित अधिवास देण्यासाठी तिलारी धरण परिसरातील ५,९८० हेक्टर वन क्षेत्रापैकी ३,७९३.७९ हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. जमीन संपादनासाठी ६३६ कोटी ८४ लाख ७ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. जमीन संपादनाची प्रक्रिया मोबदला, महसुली नोंदी व कायदेशीर तरतुदींची पडताळणी करून पार पाडली जाईल.

​आमदार दीपक केसरकरांचे प्रयत्न

​३ एप्रिल २०२५ रोजी मुंबईत वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हत्ती संवर्धन प्रकल्पावर सकारात्मक चर्चा झाली होती. त्या बैठकीतील सूचनांनुसार वन विभागाने हा सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे. आमदार दीपक केसरकर यांनी या प्रकल्पासाठी निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू केला असून, स्थानिक लोकप्रतिनिधी व हत्तीप्रवण क्षेत्रातील लोकही या प्रस्तावाला मंजुरी मिळावी म्हणून प्रयत्न करत आहेत.

​उपवनसंरक्षक मिलींद शर्मा आणि सहायक वनसंरक्षक वैभव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नियोजन पूर्ण केले आहे. या प्रकल्पामुळे तिलारी खोऱ्यातील मानव-हत्ती संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

हत्तींचा धुडगूस रोखला पाहिजे

दोडामार्ग पंचायत समितीचे उपसभापती गणेशप्रसाद गवस म्हणाले, हत्ती सतत लोकवस्ती आणि शेती बागायती मध्ये येत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. आमदार दीपक केसरकर यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करावे म्हणून आम्ही सतत कार्यरत आहोत.