शेतकऱ्यांच्या प्रती तळमळ असलेल्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समाज माध्यमांचा वापर करून शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान पुरविणे, नवी माहिती देणे, हंगामनिहाय निर्माण झालेल्या समस्यांवर उपाय सूचविण्यासाठी “तिफण फाउंडेशन” ही संस्था सुरू केली. या फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भारतातील शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणाची एक चळवळ सुरू झाली आहे. शेतकऱ्याला माहितीच्या आणि तंत्रज्ञानाच्या बळावर सक्षम करणे. डिजिटल युगात आधुनिक ज्ञान, सल्ला आणि नेटवर्किंगची गरज आहे, हे जाणून तिफण फाउंडेशन कार्यरत आहे.

सुरुवातीला काही तरुणांनी एकत्र येऊन फक्त मदतीची एक सुरुवात म्हणून विचार केला होता, पण आज ही संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन कोर्सेस, मार्गदर्शन व्हिडिओ, मोबाईल अ‍ॅप्लिकेशन (“ग्रामसेतू”), आणि स्पर्धा यांच्या माध्यमातून सतत शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे काम तिफण फाउंडेशन करीत आहे. “शेतीमध्ये बदल हवा असेल, तर शेतकऱ्याच्या मनात बदल घडवावा लागतो” आणि हा बदल घडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर, माहितीची सहज उपलब्धता आणि प्रेरणादायी नेतृत्व या त्रिसुत्रीवर फाउंडेशन कार्यरत आहे.

शेतकऱ्यांना जोडणारी डिजिटल चळवळ

तत्कालीन कृषी सहाय्यक सुखदेव जमधडे यांच्या संकल्पनेतून Farmbook या अ‍ॅपचा जन्म डिसेंबर २०१५ मध्ये झाला. शेतकऱ्यांसाठी एक असे डिजिटल माध्यम असावे जिथे तो मोकळेपणाने आपल्या शेतीविषयक अडचणी शेअर करू शकेल, बाजारभावाची अद्ययावत माहिती मिळवू शकेल, हवामानाचा अचूक अंदाज घेऊ शकेल आणि देशभरातील इतर प्रगतशील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधू शकेल. या संकल्पनेतून “Farmbook” या अ‍ॅपची कल्पना जन्माला आली.

तांत्रिक ज्ञान नसतानाही जिद्द आणि उद्देश स्पष्ट होता. शेतीला नव्या तंत्रज्ञानाची जोड देणे. सततच्या अभ्यासानंतर आणि विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून मे २०१६ मध्ये “Farmbook” अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर प्रकाशित झाले. अ‍ॅपच्या सुलभ वापरामुळे आणि उपयुक्त माहितीमुळे शेतकऱ्यांमध्ये त्याची लवकरच लोकप्रियता वाढू लागली. अनेक नामवंत वर्तमानपत्रांनी, टीव्ही चॅनेल्सनी या उपक्रमाची दखल घेतली. काही महिन्यांतच १०,००० हून अधिक शेतकऱ्यांनी हे अ‍ॅप डाउनलोड करून वापरण्यास सुरुवात केली. ही केवळ सुरुवात होती – शेतकऱ्यांना जोडणाऱ्या एका डिजिटल चळवळीचा प्रारंभ.

‘सहाय्यक कृषी अधिकारी’ पेजची सुरुवात

Farmbook च्या यशस्वी अनुभवाने आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाने प्रेरित होऊन, ५ सप्टेंबर २०१७ रोजी सहाय्यक कृषी अधिकारी या फेसबुक पेजची निर्मिती करण्यात आली. या पेजचा उद्देश होता शेतकऱ्यांना माहितीपूर्ण फोटो, इमेज आणि व्हिडिओद्वारे शेतीविषयक माहिती पुरवणे. या पेजने शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे काम केवळ जलद गतीने केले नाही, तर त्यांना एकमेकांशी जोडण्याचेही काम केले. आज या पेजचे १.४५ लाख फॉलोअर्स आहेत.

जानेवारी २०१८ मध्ये पहिल्यांदा फेसबुक लाइव्हद्वारे भुईमूग लागवड या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. हा प्रयोग यशस्वी ठरला आणि यामुळे शेतकऱ्यांपर्यंत थेट माहिती पोहोचवण्याची नवीन पद्धत सुरू झाली. या उपक्रमाला गती देण्यासाठी सहकाऱ्यांची गरज भासू लागली.

करोना टाळेबंदीच्या संकटाचा संधी म्हणून वापर

२०२० मध्ये करोना – १९ च्या प्रादुर्भावाने संपूर्ण जगाला थांबवले, परंतु तिफण फाउंडेशनच्या कार्याला यामुळे अधिक गती मिळाली. या काळात शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी फेसबुक लाइव्हद्वारे वेबिनार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. एप्रिल २०२० मध्ये पहिला वेबिनार कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. कोविडच्या काळात आठवड्याला तीन ते चार वेबिनार आयोजित होत होते. या काळात संपूर्ण महाराष्ट्रातून सहकारी जोडले गेले, ज्यांनी सक्रियपणे योगदान दिले.

‘तिफण फाउंडेशन’ला संस्थात्मक रूप

७ फेब्रुवारी २०२२ रोजी तिफण फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची औपचारिक स्थापना झाली. या संस्थेच्या निर्मितीमागे एक सशक्त आणि दूरदृष्टीपूर्ण प्रेरणा होती. शेतकऱ्यांपर्यंत शेतीसाठी उपयुक्त माहिती पोहोचवणे आणि त्यांच्या प्रगतीला चालना देणे. ‘तिफण’ हे नाव मराठीतील ‘पेरणी यंत्रा’शी संबंधित आहे, जे प्रत्यक्षात नव्या सुरुवातीचे आणि शेतीतील विकासाचे प्रतीक आहे. याच शब्दाला इंग्रजीत “Transferring Information to Farmers for Agriculture Nurturing” असा संक्षिप्त अर्थ देण्यात आला आहे, ज्याचा अर्थ होतो – “शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवून शेतीची जोपासना करणे.”

तिफण फाउंडेशनचे मुख्य कार्य डिजिटल माध्यमांचा उपयोग करून, शेतकऱ्यांना आधुनिक शेतीतंत्रज्ञान, हवामानविषयक माहिती, बाजारभाव, पीक सल्ला, जैविक व नैसर्गिक शेती, शाश्वत शेती प्रणाली यासारख्या विषयांवर सुलभ आणि प्रभावी माहिती पुरवणे हे आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, त्यांना निर्णयक्षम बनवणे आणि शेतीला अधिक वैज्ञानिक व व्यवसायिक दृष्टी देणे, हा या संस्थेचा मूल उद्देश आहे.

ऑनलाइन पीक महोत्सव : शेतकऱ्यांना जोडणारा उत्सव

कोविडच्या काळात, जेव्हा शेतकऱ्यांना अनेक अडचणी आणि मर्यादा भेडसावत होत्या, तिफण फाउंडेशनने एक महत्त्वाचा उपक्रम राबविला – हापूस ऑनलाइन महोत्सव, जो एप्रिल २०२१ मध्ये आयोजित केला गेला. या महोत्सवाचा मुख्य उद्देश होता शेतकऱ्यांना मार्गदर्शन देणे आणि त्यांच्या आंब्याच्या उत्पादनाची थेट विक्री करता यावी, जेणेकरून त्यांना मध्यस्थांमुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव करता येईल. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना केवळ आवश्यक तांत्रिक आणि विपणन सल्ला मिळाला नाही, तर त्यांना त्यांच्या आंब्याला संपूर्ण महाराष्ट्रभर थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा सुवर्णसंधी मिळाला.

महोत्सवाच्या माध्यमातून सात कोटी रुपयांच्या किंमतीचा हापूस आंबा कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट विकला गेला, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळले आणि त्यांचा उत्पन्न स्तर वाढला. हा प्रयोग केवळ आर्थिक यशस्वीच नव्हता तर तिफण फाउंडेशनच्या कार्यक्षमतेचा आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीकोनाचा एक अभूतपूर्व उदाहरण ठरला.

शेतकरी प्रबोधनाला लोकगीतांची जोड

तिफण फाउंडेशनने शेतकऱ्यांपर्यंत शेतीविषयक माहिती पोहोचवण्यासाठी डिजिटल माध्यमांसोबतच पारंपरिक लोककला प्रकारांचा प्रभावी वापर केला आहे. खरीप हंगाम २०२२ मध्ये बीज प्रक्रियेचे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी “भाऊ, तुमची घाई नका करू, गडबड पेरणीला” ही लावणी तयार करण्यात आली. ही लावणी शिवानंद आडे यांनी लिहिली, तर अनिता बनकर यांनी ती गायली. या लावणीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेची माहिती साध्या आणि प्रभावी पद्धतीने दिली. अवघ्या दोनच दिवसांत ही लावणी लाखो लोकांपर्यंत पोहोचली. या यशाने लोकगीतांच्या माध्यमातून शेतकरी प्रबोधनाचा मार्ग अधिक बळकट झाला.

याच धर्तीवर, खरीप हंगाम 2023 मध्ये “आम्ही कृषी विस्ताराचे गोंधळी” हे गोंधळ गीत तयार करण्यात आले. या गीताद्वारे शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञान आणि प्रगत शेती पद्धतींची माहिती मनोरंजक पद्धतीने देण्यात आली. तिफण फाउंडेशनच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाने शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढवण्यासोबतच पारंपरिक कला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर संगम घडवला.

ग्रामसेतू: गावकेंद्रित डिजिटल क्रांती

ग्रामसेतू हे अँड्रॉइड मोबाईल ॲप तिफण फाउंडेशनने विकसित केले असून, यामागचा मुख्य उद्देश गावपातळीवर संवादाची नवी वाट मोकळी करणे हा आहे. गावातील शेतकरी, तरुण, महिला आणि नागरिक यांच्यात माहितीचा आदानप्रदान अधिक सुलभ आणि प्रभावी व्हावा, यासाठी हे ॲप तयार करण्यात आले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध असून, त्याचा उपयोग गावासाठी डिजिटल नोटीस बोर्डप्रमाणे करता येतो. यातून गावातील विविध सामाजिक, कृषी, आरोग्य, शिक्षण आणि इतर घडामोडी शेअर करता येतात. याशिवाय, शेतकरी आपल्या शेतीतील कामे, नव्या पद्धती, समस्या आणि उपाय यांची माहिती शेअर करू शकतात.

भविष्यात ग्रामसेतूच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी संपर्क साधून शेतमालाची विक्री करता येईल, असे तंत्रज्ञान विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे दलालांचा खर्च व वेळ वाचून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे, खतं, बियाणं, औषधं यांसारख्या निविष्ठा अधिक योग्य दरात मिळवून शेतीचा एकूण खर्च कमी करणे हे देखील उद्दिष्ट आहे. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून हवामान, कीड व्यवस्थापन, माती परीक्षण, सल्ला सेवा अशा बाबतीत वैयक्तिक मार्गदर्शन देणाऱ्या सेवा ग्रामसेतूवर उपलब्ध करून देण्याचे काम सुरु आहे. ग्रामसेतू हे गावांना डिजिटलदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.

शेतकऱ्यांना सक्षम करणारा प्रवास

तिफण फाउंडेशनचे संस्थापक सुखदेव जमधडे यांनी तिफण फाउंडेशनचा प्रवास हा शेतकऱ्यांना सक्षम आणि स्वयंपूर्ण बनवण्याच्या दिशेने आहे. डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सामुदायिक सहभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे, हा तिफणचा मुख्य ध्यास आहे. ग्रामसेतू आणि PhygitalKrishi.com सारख्या उपक्रमांद्वारे तिफण फाउंडेशन शेतकऱ्यांना नव्या युगात घेऊन जाण्यासाठी सज्ज झाली आहे. शेतकऱ्यांचे नियोजनबद्ध शेती, पर्यावरणपूरक पद्धती आणि आर्थिक स्थैर्य यासाठी तिफण फाउंडेशन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला आहे.

dattatray.jadhav@expressindia.com