सांगली : भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ सांगलीत शनिवारी तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत माजी सैनिकांसह शेकडो तरूण, महिला यांनीही सहभाग घेतला. भारत माता की जयच्या घोषणा देत सहभागींनी भारतीय सैन्य दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
मार्केट यार्डमधील हुतात्मा स्मारकापासून तिरंगा रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपच्या नेत्या नीता केळकर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आदींसह माजी नगरसेवक, माजी नगरसेविका सहभागी झाले होते.
मार्केट यार्ड ते जिल्हा मध्यवर्ती बँक, कर्मवीर चौक मार्गे त्रिकोणी बागेतील शहीद स्मारकापर्यंत रॅली काढण्यात आली. याठिकाणी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
दरम्यान, उद्या रविवारी मिरजेत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आ. सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली ही सर्वपक्षीय रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून काढण्यात येणार असून या रॅलीची सांगता मिरज शहर पोलीस ठाण्याजवळ करण्यात येणार आहे. रॅलीसाठी माजी सैनिकांना उपस्थित राहण्याचे वैयक्तिक आवाहन करण्यात आले असून त्यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.