सरकारविरुद्धचा राग, काँग्रेसमुळे मतविभागणीचा फटका, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दलची सहानुभूती, मोदींचा प्रभाव या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ात राष्ट्रवादीला आपल्या पाच जागा राखण्याचे मोठे आव्हान आहे. पाच वर्षे मंत्री असलेल्या जयदत्त क्षीरसागर व सुरेश धस यांचीही गड राखताना चांगलीच दमछाक होत आहे.
भाजपला शिवसेनेच्या मतविभाजनाचा ३ ठिकाणी सामना करावा लागत आहे. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाचे आकर्षण असले, तरी कमकुवत प्रचार यंत्रणेमुळे सकारात्मक वातावरण मतांमध्ये परिवर्तित करताना भाजपचीही कसोटी लागणार आहे. मुंडे यांच्या पश्चात होत असलेल्या निवडणुकीतून विधानसभेच्या सर्व जागा जिंकून पक्षात आपले स्थान बळकट करण्यासाठी पंकजा मुंडे यांनी मोच्रेबांधणी केली आहे.
बीड जिल्हा दिवंगत मुंडे यांचा म्हणून ओळखला जात असला, तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वतंत्र राजकीय प्रयोगात पवारांना सर्वाधिक साथ याच जिल्हय़ाने दिली. मागील वेळी सहापकी पाच मतदारसंघांत राष्ट्रवादीने विजयाचा झेंडा रोवला. सध्या विधानसभेचे ५ सदस्य, यातील २ मंत्री, विधान परिषदेचे २ सदस्य अशी आमदारांची तगडी फौज राष्ट्रवादीकडे आहे. परंतु लोकसभेत पूर्ण ताकद पणाला लावूनही मुंडे दीड लाख मतांच्या फरकाने विजयी झाले. मुंडेंच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार दिला नसला, तरी काँग्रेसने मात्र अशोक पाटील यांना मैदानात उतरविले आहे. त्यांना राष्ट्रवादीचा छुपा पािठबा असला, तरी त्यांना किती मते मिळतील इतकाच विषय आहे.
भाजपकडून मुंडेंची कन्या डॉ. प्रीतम मुंडे पहिल्यांदाच लोकसभेच्या मैदानात उतरल्या आहेत. सर्वच मतदारसंघात मुंडेंना माननारा निर्णायक मतदार असल्याने सहानुभूतीच्या लाटेवर तरून जाण्याची डॉ. प्रीतम यांना खात्री वाटते. मुंडेंच्या राजकीय वारस पंकजा मुंडे याचे नाव थेट मुख्यमंत्रिपदाच्या चच्रेत आल्याने त्यांच्याविषयी आकर्षण वाढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीडहूनच राज्यातील प्रचाराला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात सर्वच मतदारसंघांत भाजपने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र होते. मात्र, केज व बीड या दोन मतदारसंघांत भाजप उमेदवारांचा कमकुवत प्रचार, शिवसेनेच्या मतविभाजनामुळे राष्ट्रवादीला फायदा होण्याची शक्यता आहे.
बीड विधानसभा मतदारसंघात मागील वेळी क्षीरसागर यांनी ७५ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला. आघाडी सरकारमध्ये ५ वर्षे पालकमंत्री राहिल्यानंतर त्यांची या वेळी नवख्या उमेदवारांनी दमछाक केल्याचे चित्र आहे. भाजपकडून विनायक मेटे, मनसेचे सुनील धांडे मदानात असले, तरी काँग्रेसचे सिराजोद्दीन देशमुख व शिवसेनेचे अनिल जगताप किती मते खेचतात, यावर विजयाचे गणित ठरणार आहे. क्षीरसागर यांची मतपेढी असलेला ओबीसी मतदार लोकसभेत मोदींमुळे भाजपला एकगठ्ठा मिळाला. मुंडेंना आधी विरोध व आता सहानुभूती यामुळे आता हा मतदार भाजपकडे कायम राहिल्यास क्षीरसागरांची अडचण होणार आहे.
केजमध्ये नमिता मुंदडा (राष्ट्रवादी), संगीता ठोंबरे (भाजप), अंजली घाडगे (काँग्रेस) यांच्यात तिरंगी लढत दिसत असली, तरी सेनेच्या कल्पना नरहिरे, तसेच काँग्रेसचा उमेदवार किती मते खेचतो, यावर निकालाचे पारडे फिरणार आहे. मुंदडा यांच्या तुलनेत ठोंबरे यांच्याकडे साधनांची कमतरता असल्याने यंत्रणेच्या बळावर मुंदडांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. भाजपचा एकगठ्ठा मतदार ही ठोंबरेंची जमेची बाजू आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात भाजपचे भीमराव धोंडे मदानात आहेत. राजकीय गुरू-शिष्य असे स्वरूप प्राप्त झालेल्या या लढतीत भाजपअंतर्गत नाराजीमुळे नकारात्मक वातावरण असतानाही धस यांची बाजू बळकट आहे. धोंडे यांनीही सर्व शक्ती पणाला लावल्यामुळे निकालाचे पारडे ऐनवेळी वरखाली होऊ शकते.
राज्याचे लक्ष वेधलेल्या परळी मतदारसंघात मुंडे कुटुंबातील बहीण-भावात सरळ लढत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने त्यांच्याविषयी सहानुभूतीची लाट आहे. पंकजा मुंडे यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या चच्रेत असल्याने ही सहानुभूती विशेष आहे. माजलगाव मतदारसंघात माजी मंत्री प्रकाश सोळंके यांना भाजपचे आर. टी. देशमुख यांच्यासह पक्षांतर्गत मोठय़ा गटाशी सामना करावा लागत आहे. मागील वेळी निसटता पराभव झालेले देशमुख आता त्याची भरपाई करणार काय, याचीही उत्सुकता आहे. गेवराईत राष्ट्रवादीचे बदामराव पंडित व अमरसिंह पंडित हे कट्टर विरोधक एकत्र आले. बदामराव यांच्यासमोर भाजपच्या लक्ष्मण पवार यांनी आव्हान उभे केले आहे. येथेही लोकसभेत भाजपला ३० हजारांचे मताधिक्य मिळाल्याने अ‍ॅड. पवार यांना विजयाची खात्री वाटते.