करोनाला रोखण्यासाठी नागपूरमध्ये नवे निर्बंध

या गोष्टी राहणार बंद…

संग्रहीत
महाराष्ट्रात खासकरुन विदर्भात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. यवतमाळ, अमरावतीमध्ये करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी पुन्हा संचारबंदी, लॉकडाउन सारखे निर्बंध लागू केले आहेत. आता नागपूर महानगरपालिकेनेही करोनाचा फैलाव रोखण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

नागपूरमध्ये ‘या’ गोष्टी बंद राहणार

– नागपूरमध्ये बाजारपेठा व दुकाने दर शनिवार-रविवार पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

– नागपूमधील रेस्टॉरेन्ट, हॉटेल दर शनिवारी-रविवारी पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

– रेस्टॉरेन्ट, हॉटेल बंद राहणार असले, तरी हॉटेल्सची खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवण्याची ऑनलाइन सेवा सुरु राहील.

– शहरातील जलतरण तलाव व वाचनालय उद्यापासून सात मार्च पर्यंत बंद राहतील.

नागपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये ८ करोनाबाधितांचा मृत्यू झाला तर ६९१ नवीन रुग्णांची भर पडली. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या थेट ६,४६८ वर पोहोचली आहे.

सक्रिय रुग्णांमध्ये शहरातील ५,२९०, ग्रामीण १,१७८ अशा एकूण ६,४६८ रुग्णांचा समावेश आहे. एकूण रुग्णांपैकी गंभीर संवर्गातील १,१३७ रुग्णांवर विविध रुग्णालयांत तर ४,६४० रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत.

रुग्णालयांतील गंभीर रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान, मंगळवारी शहरात दिवसभरात ५५१, ग्रामीणला १३८ असे एकूण ६९१ रुग्णांची भर पडली. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या १ लाख १५ हजार ४२०, ग्रामीण २८ हजार १८४, जिल्ह्याबाहेरील ९३० अशी एकूण १ लाख ३३ हजार ७७५ रुग्णांवर पोहोचली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: To contain corona cases new restrictions for nagpur city dmp