सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व बुधवारी स्वीकारले. यासाठीचे पत्र त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिले. काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. यामुळे ते जिंकल्यानंतर उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. यावर विशाल पाटील आणि माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी आज संवाद साधला. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

माध्यमांशी बोलताना आधी माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले, “प्रत्येक जिल्ह्याची राजकीय परिस्थिती वेगवेगळी असते. सांगलीची राजकीय परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न सातत्याने आमदार म्हणून केला. जिल्ह्यातील लोकांच्या मनातील भावना मांडण्याचा प्रयत्न करत होतो. महाविकास आघाडीत एक पाऊल पुढे एक पाऊल मागे जात असतं. काँग्रेसकडून ही जागा सुटली गेली. परंतु, जनतेने ही निवडूक हातात घेतली. जनतेने अपक्ष खासदार निवडून दिला. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. महाविकास आघाडीचा हेतू होता की भाजपाला हरवणं, निवडून आलेला खासदार महाविकास आघाडी बरोबर आहे. आम्ही काँग्रेसला समर्थन दिलं आहे.”

हेही वाचा >> खासदार विशाल पाटील यांचा कॉंग्रेसला पाठिंबा

यापुढे पत्रकारांनी उद्धव ठाकरेंच्या नाराजीबाबत प्रश्न विचारला. त्यावर विशाल पाटील म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे आणि वसंतदादा पाटील यांचे चांगले संबंध होते. वसंत दादांचा नातू निवडून आला आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंना आनंद झाला असेल. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याची गरज वाटत नाही. आता जे झालं ते झालं, असं संजय राऊतही म्हणाले आहेत.”

विशाल पाटलांचे काँग्रेसला समर्थन

माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यासोबत खासदार पाटील आजच मुंबईला रवाना झाले होते. मुंबईत प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांची भेट ते घेणार होते. मात्र मुंबईत अधिक वेळ न दवडता आमदार कदम यांनी खासदार पाटील यांना घेऊन थेट दिल्ली गाठली. दिल्लीत खरगे यांची भेट घेऊन कॉंग्रेसला पाठिंबा देत असल्याचे पत्र दिले. पाटील यांच्या कॉंग्रेसला पाठिंबा देऊन सहयोगी सदस्यत्व स्वीकारल्याने कॉंग्रेसचे राज्यातील संख्याबळ १४ तर देशात १०० झाले आहे. सोनिया गांधी  राहुल गांधी यांची भेट घेऊन आज दोघेही मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेण्यासाठी आले होते.

सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत बऱ्याच वाटाघाटी झाल्या. जागावाटप अंतिम होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे सांगली काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली. विश्वजीत कदम यांनी जाहीरपणे ही नाराजी बोलूनही दाखवली. त्यानंतर मात्र त्यांनी माघार घेत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी मान्य केली. मात्र, विशाल पाटील यांनी बंडखोरी करत सांगलीतून अपक्ष अर्ज दाखल केला आणि ते विजयीही झाले.