Asani Cyclone: शनिवारी (७ मे) रोजी अंदमानच्या समुद्रात निर्माण झालेल्या ‘असनी’ चक्रीवादळाने सोमवारी (९ मे) वेग घेतला आहे. या चक्रीवादळाचं रूपांतर तीव्र चक्रीवादळामध्ये झालं आहे. हे चक्रीवादळ मंगळवारी (१० मे) आंध्रप्रदेश आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर धडकणार आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ सध्या अंदमान निकोबार बेटांपासून २७० किलोमीटर, पोर्टब्लेअरपासून ४५० कि.मी., तर आंध्रप्रदेश व पुरीपासून ६१० कि.मी. अंतरावर खोल समुद्रात आहे. मंगळवारी हे चक्रीवादळ उत्तर आंध्रप्रदेश आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर पोहोचणार आहे. सध्या या चक्रीवादळाचा वेग ताशी ८० ते ९० कि.मी. असून मंगळवारी हा वेग ताशी १०० ते १२० कि.मी. इतका वाढण्याची शक्यता आहे.

recruitment in indian air force
नोकरीची संधी : भारतीय वायुसेनेतील भरती
mahayuti ahmednagar
नगरमध्ये महायुतीत एकोप्याचा अभाव, महाविकास आघाडी संघटित
Unseasonal rain Washim
वाशिममध्ये अवकाळी पाऊस, गारपीट; हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा हवालदिल
Sansad Bhavan
Rajysabha Election : महाराष्ट्रात बिनविरोध, पण ‘या’ राज्यांत अटीतटीची लढत, क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी काँग्रेसकडून व्हिप जारी!

बुधवारनंतर (११ मे) या चक्रीवादळाचा वेग कमी होऊन तो ६० ते ७० प्रति तास एवढा होईल. गुरूवारी (१२ मे) या चक्रीवादळाचे रूपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. या चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

आगामी तीन दिवस देशभर उष्णतेची लाट असणार आहे. देशातील राजस्थान, दिल्ली, हरियाणा, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र (विदर्भ), उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांत पुढील तीन दिवस अतितीव्र उष्णतेची लाट कायम राहणार आहे. राज्यातील अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ या भागात उष्णतेच्या लाटेचा पिवळा इशारा देण्यात आला आहे. १० मे रोजी आंध्रप्रदेश, ओडिसा, तर ११ मे रोजी आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिसा या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्रातील काही भागांत पुढील तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १० ते १३ मे रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तर १३ मे रोजी पुणे, धुळे, जळगाव, नाशिक, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड आणि अहमदनगर या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय ११ ते १३ मे दरम्यान मुंबई, परभणी, कोल्हापूर आणि सातारा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.