जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीवर विधानसभेच्या निवडणुकीचे सावट पडले असून, पदाधिकारी निवडीत दोन्ही काँग्रेसपुढे विशेषत: राष्ट्रवादीकडे अधिक अडचणी निर्माण होणार आहेत. अध्यक्षपदाच्या निवडीची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उद्या (मंगळवारी) सकाळी पक्षाच्या जि.प. सदस्यांची बैठक बोलावली असतानाच पक्षाच्या दक्षिणेतील एका सदस्याने पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे काल पाठवून दिला आहे. काही सदस्यही या बैठकीला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीची अस्वस्थता बाहेर पडण्याची शक्यता आहे.
पक्षाची जिल्हय़ातील बदलती परिस्थिती लक्षात घेऊनच राष्ट्रवादीने काहीशी पडती भूमिका घेत काँग्रेसबरोबर जि.प.तील सत्तेसाठी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडीचे संख्याबळ मजबूत होत असल्याने सत्तास्थापनेसाठी फारसे सायास पडणार नसले तरी राष्ट्रवादीतील अस्वस्थतेकडे काँग्रेसबरोबरच भाजपचे नेतेही लक्ष ठेवून आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची दि. २१ रोजी निवड होणार आहे. जि.प.त राष्ट्रवादीचे ३२, काँग्रेसचे २८, भाजप व सेनेचे १२, एक कम्युनिस्ट व दोघे अपक्ष असे बलाबल आहे.
दोन्ही काँग्रेसच्या तिन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादीकडे जास्त संख्याबळाच्या आधारावर अध्यक्षपद व दोन समित्या, तर काँग्रेसकडे उपाध्यक्षपद व दोन समित्या ठरवण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी सत्तेतून भाजप-सेना युतीला सोडचिठ्ठी देणार आहे. अध्यक्षपदासाठी मंजूषा राजेंद्र गुंड, कालिंदी लामखडे, योगिता राजळे, अश्विनी युवराज भालदंड आदींची नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेसकडून उपाध्यक्षपदासाठी ज्येष्ठ सदस्य सुभाष पाटील, परमवीर पांडुळे, बाळासाहेब हराळ आदी इच्छुक आहेत.
अध्यक्षपदाच्या इच्छुकांची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादीने मंगळवारी सकाळी पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत सदस्यांची बैठक आयोजित केली आहे. मात्र काँग्रेसच्या सदस्यांची बैठक अद्याप पक्षाच्या नेत्यांनी बोलावलेली नाही किंवा मुंबईत झालेल्या आघाडीच्या निर्णयाची माहितीही सदस्यांना अधिकृतरीत्या दिली गेली नाही. त्यामुळे सदस्य संभ्रमावस्थेत आहेत. काँग्रेसला उपाध्यक्षपद मिळताना ते पक्षातील विखे गटाला की थोरात गटाला याचाही निर्णय अद्याप झालेला नाही. जि.प.त थोरात गटापेक्षा विखे गटाचे सदस्य अधिक आहेत.
दरम्यान, आमदार बबनराव पाचपुते यांना श्रीगोंद्यात शह देण्यासाठी राष्ट्रवादीकडून काही जणांना साखर संघ, साई संस्थानचे विश्वस्तपद अशी प्रलोभने दाखवली जात आहेत. त्यातच पक्षात पुन्हा माजी जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याने अस्वस्थ झालेल्या एका सदस्याने जिल्हाध्यक्षांकडे पक्ष सदस्यपदाचा राजीनामा पाठवून दिला आहे. ‘दोन दिवस वाट पहा दक्षिणेत स्फोट घडेल’, असेही वक्तव्य या सदस्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना नाव न छापण्याच्या अटीवर केले. या सदस्याने समविचारी सदस्यांशी संपर्क सुरू केल्याने जि.प. पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने विधानसभेची अस्वस्थता बाहेर पडेल, असे मानले जाते.