पालघर : २०.२० मीटर अशा देशातील सर्वाधिक खोलीच्या वाढवण बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.३० रोजी ) होणार आहे. पालघर येथे दुपारी १ वाजता हा समारंभ होईल. ७६ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून उभारण्यात येणारे हे बंदर जगातील पहिल्या दहामध्ये स्थान मिळवेल, असा विश्वास केंद्रीय जहाज वाहतूक व जलमार्गमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केला.
वर्षाला सुमारे ३०० दशलक्ष टन मालवाहतूक व २३.२० दशलक्ष कंटेनर हाताळणी करण्याची क्षमता असलेले हे बंदर दोन टप्प्यात उभारण्यात येणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय मार्गांची थेट जोडणी (कनेक्टिव्हिटी) शक्य असून त्यामुळे वेळ व खर्च बचत होण्यास मदत होईल. आधुनिक तंत्रज्ञान व पायाभूत सुविधांनी सुसज्ज असणाऱ्या बंदरात डीप बर्थ, कार्यक्षम कार्गो हाताळणी सुविधा व आधुनिक बंदर व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित असून स्थानिकांना रोजगारात प्राधान्याने संधी दिला जाईल.
देशातील १२ प्रमुख बंदरांचे गेल्या १० वर्षांत आधुनिकीकरण करण्यात आले असून वाढवण येथे उभारण्यात येणारे हे बंदर हे देशाला आत्मनिर्भयतेकडे नेण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल. या बंदरामुळे वेगळी ओळख निर्माण होणार असून देशाला अग्रगण्य सागरी राष्ट्र बनवण्यात या बंदराचे योगदान महत्त्वपूर्ण राहील असे सोनोवाल यांनी स्पष्ट केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर, खासदार डॉ. हेमंत सवरा, केंद्रीय बंदर विभागाचे सचिव टी.के रामाचंद्रन आदी मान्यवर उपस्थित होते.
बंदराच्या उभारणीसाठी नव्याने रस्त्यांची उभारणी करण्यात येणार असून भूसंपादनासाठी उदार पुनर्वसन पॅकेज देण्यात येतील. मच्छीमार समाज व इतर घटकातील नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्याशी थेट संवाद साधण्यात येईल.
सर्बानंद सोनोवाल, केंद्रीयमंत्री