पुणे-सातारा महामार्गावर आनेवाडी आणि खेड-शिवापूर टोलनाक्यावर बनावट पावत्यांद्वारे टोलवसुली केली जात असल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. गेल्या ४२ दिवसांपासून या दोन्ही नाक्यावरील संगणक ‘हॅक’ करून रात्री बारा ते पहाटे तीन वाजेपर्यंत बनावट पावत्यांद्वारे टोलवसुली सुरू होती. या प्रकरणी पोलिसांनी सहाहून अधिक कर्मचाऱ्यांना अटक केली असून यातील सूत्रधार असलेली टोळी मात्र फरार झाली आहे.

पुणे येथील अभिजित बाबर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आनेवाडी व खेड-शिवापूर टोल नाक्यावर पंचांच्या समक्ष ही कारवाई केली. त्यामध्ये त्यांना टोलनाक्यावर दिल्या जात असलेल्या पावत्या बनावट असल्याचे आढळून आले. त्यावरून पोलिसांनी अधिक तपास केल्यावर नाक्यावरील संगणक ‘हॅक’ करून बनावट पावत्यांद्वारे टोलवसुली केली जात असल्याचे आढळून आले. गेल्या ४२ दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे.

रात्री बारा ते पहाटे तीन वाजेपर्यंतच्या दरम्यान या नाक्यांवरून ये-जा करणाऱ्या वाहनांना या बनावट पावत्या देत टोलवसुली केली जात होती. त्याची नोंद टोल नाक्याच्या संगणकावर होत नसल्याचेही दिसून आले. या घटनेचे सूत्रधार उत्तर प्रदेशातील असून त्यांनी टोल नाक्यावरील संगणक ‘हॅक’ करून हा प्रकार केला आहे. या सूत्रधार असलेल्या टोळीतील सर्व जण मात्र हा प्रकार उघडकीस येताच फरारी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.