अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे आणि कोलाड येथील पुलांची कामे वगळली तर पळस्पे ते इंदापूर टप्प्यातील महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काम पूर्ण होण्याआधीच पथकर नाके कार्यान्वित करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या आठवड्याभरात त्याबाबत अधिसूचना जारी होणार असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर मार्गाचे चौपदरीकरण आणि रुंदीकरण २०११ मध्ये सुरू झाले होते. विविध कारणांमुळे हे काम रखडत गेले. याला अनेक कारणे आहेत. त्यात निधीची कमतरता, पर्यावरणविषयक परवानगी मिळण्यात आलेल्या अडचणी, भूसंपादनाचा मुद्दा आणि ठेकेदाराची निष्क्रियता यामुळे विलंब होत गेला. पंधरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता हे काम आता मे अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोलाड, नागोठणे येथील पुलांची कामे सोडली तर बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पथकर नाके कार्यान्वित करण्यासाठी
रस्त्याचे काम होण्यापूर्वीच पथकरवसुलीची तयारी हालचालींना वेग आला आहे.

पथकर कोठे?

पहिल्या टप्प्यात खारपाडा आणि खांब या दोन ठिकाणी पथकर द्यावा लागणार आहे. तर दुसर्‍या टप्प्यात पोलादपूरजवळ लोहारे येथेही पथकर वसून केला जाणार आहे. खारपाडा आणि खांब येथील नाक्यांच्या उभारणीच्या कामांना वेग आला आहे. पथकर किती असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. येत्या आठवड्यात टोल अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतरच प्रवासाठी किती पैसे द्यावे लागतील हे स्पष्ट होणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे किरकोळ कामे शिल्लक आहेत. त्यामुळे पथकर नाके आठवड्याभरात कार्यान्वित केले जाऊ शकतात. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यावर तो किती असेल हे स्पष्ट होईल. – रवींद्र इंगुले, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पनवेल</strong>