टोमॅटो, हिरव्या मिरचीपाठोपाठ ढोबळीही रस्त्यावर

करोनाच्या संसर्गामुळे बाजारातील कामकाजावर परिणाम झाला आहे

दोन रुपये किलो भाव मिळाल्याने शेतकरी उद्विग्न

इंदापूर : भाव मिळत नसल्याने उद्विग्न झालेल्या शेतक ऱ्यांनी टोमॅटो, हिरवी मिरची रस्त्यावर फेकून निषेध केल्याच्या घटना राज्यात घडत असताना  ढोबळी मिरचीला घाऊक बाजारात दोन रुपये किलो असा भाव मिळाल्याने पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरमधील शेतक ऱ्यांनी ढोबळी मिरची रस्त्यावर फेकून निषेध केला.

करोनाच्या संसर्गामुळे बाजारातील कामकाजावर परिणाम झाला आहे. थकीत वीजदेयके तसेच करोनाच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. शेतीमालाला अपेक्षाएवढा भाव मिळत नसल्याने शेतकरी  टोमॅटो, हिरवी मिरची, ढोबळी मिरची रस्त्यावर फेकून निषेध करत आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावातील शेतकरी खंडू राजगुरू यांनी शेतात तीन एकरांवर ढोबळीची लागवड केली होती. ढोबळीची लागवड करण्यासाठी त्यांनी हजारो रुपये खर्च केले.

ढोबळीची प्रतवारीही चांगली निघाली. राजगुरू यांनी टेम्पोतून इंदापूर शहरात ढोबळी विक्रीस आणली. घाऊक बाजारात प्रतिकिलो  दोन रुपये असा भाव ढोबळी मिरचीला मिळाल्याने राजगुरू निराश झाले. महामार्गावरील बाबा चौकात त्यांनी नागरिकांना ढोबळी मिरची वाटली. नागरिकांकडून त्यांनी पैसेही घेतले नाही. उर्वरित ढोबळी मिरची त्यांनी सोलापूर महामार्गावर फेकून दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tomato green pepper price of two rupees per kg akp