सातारा : Tomato Price in Satara बिघडलेले हवामान आणि टोमॅटोच्या पिकावर वेगवेगळ्या साथीचे आक्रमण झाल्याने बाजारात टोमॅटोची आवक घटली आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात भाव वधारले आहेत. मात्र याचा फायदा सध्या शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी आणि विक्रेत्यांनाच अधिक होत आहे. यालाच उत्तर देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव परिसरातील टोमॅटो उत्पादकांनी ‘टोमॅटो आमचा, दरही आमचाच..!’ असा संकल्प बांधत टोमॅटो विक्री सुरू केली आहे. सध्या येथील शेतकरी एकत्रितपणे मुंबई, पुण्याच्या बाजार समितीतील घाऊक व्यापाऱ्यांशी बोलून आपला दर ठरवतात आणि त्यानुसारच व्यवहार करतात. शेतकऱ्यांची ही एकी आणि त्यांच्या या उपक्रमाची सध्या साताऱ्यात सर्वत्र चर्चा आहे. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील तडवळे संमत कोरेगाव, कुमठे, खेड नांदगिरी, जळगाव, भोसे, सांगवी, सुलतानवाडी, सातारा रोड ही मोठी गावे बागायती म्हणून ओळखली जातात. या गावांमध्ये प्रगतशील शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस, आले या नगदी पिकांसह टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वांगी आदी भाजीपाला घेतात. या गावांमधून रोज भाजीपाल्याचे अनेक ट्रक मुंबई, वाशी, पुण्यासह इतर बाजारात जातात. यामध्ये टोमॅटो पिकाचा वाटा लक्षणीय आहे. ही गावे रोज ताजा शेतीमाल शहराच्या बाजारात पाठवतात पण त्याला भाव मात्र अनेकदा कवडीमोल मिळतो. गेल्या काही दिवसांपासून शहरातील टोमॅटोचे दर कमालीचे वधारलेले असताना हाच अनुभव पुन्हा या शेतकऱ्यांना येऊ लागल्याने त्यांनी एकत्र येत वरील निर्णय घेतला. हेही वाचा >>> राज्यातील धान्य वितरण दहा दिवसांपासून ठप्प, काय आहे कारण जाणून घ्या गेल्या महिनाभरापासून शहरातील टोमॅटोचे दर किलोला शंभर रुपयांच्या घरात टिकून आहेत. शेतकऱ्यांना मात्र किलोला अवघा ३० ते ४० रुपये दर मिळत होता. दरातील ही भली मोठी तफावत विचारात घेता शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. दर पडले, की शेतकऱ्यांच्या मालाला कुणीही विचारत नाही. अनेकदा टोमॅटो काढणीही परवडत नाही. अशा वेळी उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवावा लागतो. तेच दुसरीकडे दर वाढल्यावरही शेतकऱ्यांपर्यंत तो पोहोचत नाही. यातूनच या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येत ही नवी चळवळ उभी केली आहे, ‘टोमॅटो आमचा, दरही आमचाच..!’ हेही वाचा >>> Petrol-Diesel Price Today: तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर, मुंबई-पुण्यातील पाहा आजचा भाव सध्या या भागातील शेतकरी एकत्र आले आहेत. हे शेतकरी रोज पुण्या-मुंबईतील बाजारातील घाऊक व्यापाऱ्यांशी बोलून रोजच्या दराचा अंदाज घेतात आणि मग त्यांचा दर ठरवतात. या ठरलेल्या दराच्या खाली कुणीही टोमॅटोची विक्री करायची नाही हा इथला नियम. पूर्वी या भागातील शेतकऱ्यांकडून १४०० रुपये कॅरेटने (३० किलो वजन) टोमॅटोची खरेदी केली जात होती. आता तेच या एकीनंतर शेतकऱ्यांना १८०० रुपये (६० रुपये किलो दर) मिळू लागले आहेत. केवळ शेतकरी एकत्र येण्यामुळे हा बदल घडला आहे. साताऱ्यातील या एकीची, त्यातून त्यांनी मिळवलेल्या यशाचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. तडवळेत (ता. कोरेगाव) रोज सकाळी गावातील टोमॅटो उत्पादक पुण्या-मुंबईच्या मोठ्या व्यापाऱ्यांशी संपर्क करत दराचा अंदाज घेतात. त्यानंतर या भागातील सर्व शेतकरी आणि व्यापाऱ्यांची बैठक होऊन त्यात टोमॅटोचा दर सर्वानुमते निश्चित केला जातो. यातून शेतकरी आणि व्यापारी वर्गाचेही हित साधले जाते. - मोहनराव माने- सरपंच, तडवळे संमत कोरेगाव