महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उकरून काढल्यानंतर, महाविकास आघाडी सरकार विरुद्ध राज ठाकरे असा वाद निर्माण झाला आहे. पण या वादात आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी देखील उडी मारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्रीबाहेर आपण हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं त्यांनी गुरुवारी जाहीर केलं होतं. त्यासाठी शुक्रवारी ते मुंबईत दाखल देखील झाले होते.

पण राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याने मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली. याच पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून मुंबईतील खेरवाडी पोलिसांनी राणा दाम्पत्याला घरी जाऊन नोटीस बजावली होती. पण त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला इरादा बोलून दाखवला आहे. उद्या कसल्याही परिस्थितीत आपण मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काळात हनुमान चालिसा पठण करण्यावरून राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.

अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, महाराष्ट्रावर आलेल्या संकटाच्या मुक्तीसाठी आम्ही मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचं नाव घेत वारंवार मत मागितली आहेत. पण तेच आता हिंदुत्वाचा विरोध करत आहेत. राज्यातील सत्ता मिळताच त्यांना हिंदुत्वाचा विसर पडला आहे. त्यामुळे त्यांना जागं करण्यासाठी आम्ही मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करणार आहोत. उद्या सकाळी नऊ वाजता मातोश्रीवर जाणार आहोत, असंही रवी राणा यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे.

“बाळासाहेब ठाकरे आता हयात असते, तर त्यांनी आमचं स्वागत केलं असतं. एकवेळ नव्हे तर, शंभर वेळा हनुमान चालिसा पठण करा, असं ते आम्हाला म्हणाले असते. पण शिवसेनेला सध्या बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विसर पडला आहे. याचीच जाणीव करून देण्यासाठी आम्ही उद्या सकाळी नऊ वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार आहोत. आम्ही कायदा सुव्यवस्था पालन करू, मुंबईकराना कुठलही त्रास देणार नाही”, असं रवी राणा यांनी म्हणाले.

राज्यात वीज टंचाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर उद्धव ठाकरे काहीच बोलत नाहीत. या सर्व प्रश्नांची आठवण करून देण्यासाठी आम्ही हनुमान चालिसा पठण करणार आहोत. बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक असते, तर त्यांनी आमचा विरोध केला नसता, असं नवनीत राणांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. यावेळी संजय राऊतांबद्दल प्रश्न विचारला असता, संजय राऊत हे पोपट आहेत. ते दररोज सकाळी पत्रकारांना बोलावून बडबड करत असतात, अशी बोचरी टीका नवनीत राणा यांनी केली आहे.