जहाल नक्षलवादी गुडसा उसेंडी आंध्र प्रदेश पोलिसांना शरण

आंध्र प्रदेश पोलिसांसमोर शरण आलेला जहाल नक्षलवादी गुडसा उसेंडी वैफल्यग्रस्त झाला आहे, अशी माहिती एक महिन्यापासून महाराष्ट्र व छत्तीसगड पोलिसांना मिळाली होती.

आंध्र प्रदेश पोलिसांसमोर शरण आलेला जहाल नक्षलवादी गुडसा उसेंडी वैफल्यग्रस्त झाला आहे, अशी माहिती एक महिन्यापासून महाराष्ट्र व छत्तीसगड पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे त्याला पकडण्यासाठी सापळाही रचण्यात आला होता, पण तो यशस्वी झाला नाही. अखेर उसेंडी आंध्रमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला, असा नवा घटनाक्रम आता समोर आला आहे.
नक्षलवाद्यांच्या सर्वात शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या दंडकारण्य स्पेशल झोन समितीचा प्रवक्ता म्हणून काम करणाऱ्या गुमडावेल्ली व्यंकटक्रिष्णा प्रसाद उर्फ गुडसा उसेंडीने काल, बुधवारी आंध्र पोलिसांसमोर पत्नी राजीसह आत्मसमर्पण केले. देशभरातील प्रसार माध्यमांशी अतिशय धूर्तपणे संपर्क ठेवण्यात माहीर असलेला गुडसा उसेंडी सध्या वैफल्यग्रस्त झालेला होता. हे वैफल्य वैचारिक स्वरूपाचे होते, असे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी २५ मे रोजी बस्तरमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मारले गेले होते. या हल्ल्याचे आदेश गुडसा उसेंडीने दिले होते. यात महेंद्र कर्मांसोबत इतर नेते सुद्धा मारले गेल्याने उसेंडी अस्वस्थ झाला होता. या अस्वस्थतेतून त्याने ‘हमारी गंभीर गलतिया’ या नावाने एक पत्रक सुद्धा प्रसिद्धीला दिले होते. यावरून त्याचा पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसोबत बराच वाद झाला. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या गुडसाने चळवळ सोडण्याचा निर्णय घेतला. महिन्यापूर्वी त्याने चळवळीपासून फारकत घेऊन आंध्र प्रदेशात जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
या घडामोडींची माहिती महाराष्ट्र पोलिसांना मिळाल्यानंतर येथील अधिकाऱ्यांनी छत्तीसगड पोलिसांना सतर्क केले. २२ डिसेंबरला गुडसा उसेंडी कांकेरला येणार आहे, अशी माहिती मिळताच दोन्ही राज्याच्या पोलिसांनी सापळा रचला. मात्र, उसेंडी पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरला. आंध्र प्रदेशात शरण येणाऱ्या नक्षलवाद्यांना भरपूर पैसे मिळत असल्याने उसेंडी तिकडे गेला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. नक्षलवाद्यांचा प्रमुख गणपतीसोबत या चळवळीत सक्रीय झालेल्या या पदवीधर नक्षलवाद्याने गेल्या काही वषार्ंपासून अबूजमाडच्या जंगलात तळ ठोकला होता.
जून २००० मध्ये याच जंगलात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत गुडसा उसेंडी हा १७ वर्षांचा नक्षलवादी ठार झाला होता. उसेंडी कधीही मरणार नाही, अशी शपथ घेत व माडिया आदिवासींना आणखी जवळ करण्यासाठी गुमडावेल्ली प्रसादने तेव्हापासून हे नाव धारण केले होते. नक्षलवाद्यांच्या ‘थिंक टँक’मध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या प्रसादच्या शरणागतीमुळे नक्षलवाद्यांना मोठा हादरा बसला आहे. सुकमाचे जिल्हाधिकारी अ‍ॅलेक्स पॉल मेनन यांचे अपहरण नक्षलवाद्यांनी केल्यानंतर सरकारसोबत मध्यस्थ म्हणून कुणाची नेमणूक करायची, असा प्रश्न या चळवळीसमोर उपस्थित झाला तेव्हा उसेंडीने बी.डी. शर्मा यांचे नाव सुचवले होते. मध्यस्थांची नावे ठरवणे, त्यांना निरोप देणे, राजी करणे, ही सर्व कामे उसेंडीने पार पाडली होती. त्याच्यावर तीनही राज्यात ६० पेक्षा जास्त गुन्हे आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Top naxal leader gudsa usendi surrendered as he was fed up with movement

ताज्या बातम्या