अलिबाग : कर्जत तालुक्यातील साईडोंगर परिसरात टोरंट पॉवर प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या वृक्षतोडीच्या ठिकाणी एक उदमांजर मृतावस्थेत आढळून आले आहे. वृक्षतोडीदरम्यान झाड अंगावर पडल्याने या वन्यप्राण्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे वन्यजीव अभ्यासक आणि प्राणीमित्र संघटनांमध्ये संताप व्यक्त होत असून, मृत्यूच्या कारणांचा सखोल तपास करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान या वृक्षतोडीमुळे या परिसरातील वन्यजीव अधिवासालाही धोका निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

कर्जत तालुक्यातील साईडोंगर परिसरातील २३३ हेक्टर वनजमीन टोरंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी देण्यात आली आहे. या ठिकाणी कंपनी प्रशासनाकडून दोन हजारांहून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली आहे. या वृक्षतोडीमुळे पर्यावरणवादी संघटना आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच, आता याच वृक्षतोड झालेल्या परिसरात एक उदमांजर मृतावस्थेत आढळून आले आहे. या मृत उदमांजराची छायाचित्रे समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली आहेत.

वृक्षतोडीदरम्यान झाड अंगावर पडल्याने या उदमांजराचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे वृक्षतोडीचा परिसरातील वन्यजीवांच्या अधिवासावर होणारा परिणाम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्राण्याच्या मृत्यूची चौकशी करून त्यास कारणीभूत असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वन्यजीव अभ्यासक आणि प्राणीमित्र संघटनांकडून केली जात आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, इंडियन सिव्हेट कॅट अर्थात लहान भारतीय उदमांजराचा वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ मधील अनुसूची एकमध्ये समावेश आहे. त्यामुळे या वन्यप्राण्याची शिकार करणे किंवा त्याला मारणे हा गंभीर गुन्हा ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर उदमांजराच्या मृत्यूची सखोल चौकशी करून त्यास जबाबदार असणाऱ्या वृक्षतोडीला परवानगी देणाऱ्या वन अधिकाऱ्यांसह कंपनीच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न वन्यजीवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

पाच वर्षांत होणारी मंजुरी घाईघाईने दिली

या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी किमान पाच वर्षांचा कालावधी लागायला हवा होता. मात्र, घाईघाईने प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. जनसुनावणीच्या वेळी या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरण आणि वन्यजीवांवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असे लेखी आक्षेप आम्ही नोंदवले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आज एका उदमांजराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असली, तरी वृक्षतोडीमुळे आणखी किती पशुपक्ष्यांच्या अधिवासावर परिणाम झाला असेल, याची मोजदाद कोण करणार, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

आज केवळ एका उदमांजराचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र, या वृक्षतोडीमुळे आणखी किती पशुपक्षी बळी पडले असतील, हे सांगता येणार नाही. एरवी एखाद्याने उदमांजर पाळले, तर वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस संबंधितांवर गुन्हे दाखल करतात. मग आता या प्रकरणात वन अधिकारी आणि पोलीस संबंधित कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करणार का?– हृषीकेश जोशी, समन्वयक, लोक जागरण वन पर्यावरण रक्षण समिती