साताऱ्यात मुसळधार; कास तलाव भरला

साताऱ्यासह पंधरा गावांना पाणी पुरवठा करणारा कास तलाव  पूर्णपणे भरला असून सांडव्यावरून पाणी  वाहू लागले आहे.

गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसधार पावसामुळे साताऱ्यासह पंधरा गावांना पाणी पुरवठा करणारा कास तलाव शुक्रवारी पूर्णपणे भरला.

वाई : साताऱ्यासह पंधरा गावांना पाणी पुरवठा करणारा कास तलाव  पूर्णपणे भरला असून सांडव्यावरून पाणी  वाहू लागले आहे. सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात व कास परिसरात मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे तलाव पूर्णपणे भरला आहे. याशिवाय तालुक्यातील छोटे—मोठे तलाव  भरत आले असून ओढे नाले दुथडी भरुन वाहत आहेत. महाबळेश्वर परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे.

साताऱ्यासह महाबळेश्वर, पाचगणी, वाई, कास पठार, जावली परिसरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे नदी नाले तुडुंब भरले आहेत. सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात व कास परिसरात मागील काही दिवसात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे  तलाव  पूर्णपणे भरला असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. कास तलावातून जाणारे पाणी पुढे वजराई धबधब्यात  कोसळत असल्याने भांबवली वजराई धबधबा पूर्ण क्षमतेने वाहणार आहे.  सातारा शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहराला मोठय़ा प्रमाणात पाण्याची गरज भासते. त्यासाठी मागील तीन वर्षांंपासून कास धरण उंची वाढवण्याचे काम सुरु आहे. यावर्षीही हे धरणाचे काम पूर्ण न झाल्याने पाणीसाठा व साठवण क्षमता जैसै थे राहणार आहे. यावर्षी सातत्याने होत असलेल्या पावसाने कासची पाणीपातळी मे महिन्यातही समाधानकारक होती. हा तलाव ब्रिटिशकालीन आहे. या तलावातून साताऱ्यासह नजीकच्या पंधरा गावांना पिण्याचे पाणी  पुरविले जाते. हा तलाव सन १८८५ मध्ये बांधण्यात आला. याची क्षमता १०७ दक्ष लक्ष घनफूट इतकी आहे. कास धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच धरणाच्या भिंतीची उंची १२.३६ मीटर वाढणार आहे.

पाणी साठय़ाची क्षमता वाढणार असल्याने सातारकरांचा भविष्यातील पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचे उरमोडी धरण विभागाचे शाखा अभियंता अरिफ मोमीन यांनी लोकसत्ताला सांगितले. महाबळेश्वर परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे सर्वत्र पाणी पाणी झाले आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत सातारा ४१.४ मिमी (२०१.९), महाबळेश्वर येथे ११८.६मिमी(५६३.२), पाचगणी ७५.२ मिमी, तापोळा १३८.४ मिमी, लामज १४५.१ मिमी  तर वाई ३९.९(१९५.४) मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना, धोम व धोम बलकवडी, नागेवाडी धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Torrential downpour satara kas filled the lake ssh

ताज्या बातम्या