अलिबाग – रायगड जिल्‍हा परीषद आणि पंचायत समिती निवडणकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत मंगळवारी संपली. त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. ५९ जांगासाठी १७३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर १५ पंचायत समित्यांच्या ११८ जांगासाठी ३२९ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. .

रायगड जिल्‍हा परीषद व जिल्‍हयातील १५ पंचायत समित्‍यांच्‍या सार्वत्रिक निवडणूक येत्‍या ५ फेब्रुवारी रोजी होत आहे. त्‍यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्‍याचा आजचा शेवटचा दिवस होता. आजच्‍या अंतिम दिवसापर्यंत जिल्‍हा परीषदेसाठीच्‍या १८८ तर पंचायत समितीच्‍या ३२७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी ३६८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. ज्यापैकी ७ अर्ज अवैध ठरले. १८८ जणांनी माघार घेतली त्यामुळे १७३ उमेदवार निवडणुक रिंगणात शिल्लक राहीले आहेत. त्यांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे. पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी ६७८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी २२ जणांचे अर्ज अवैध ठरले, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ३२७ जणांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले. त्यामुळे ३२९ उमेदवार प्रत्यक्ष निवडणुक रिंगणात शिल्लक राहीले आहेत. चिन्ह वाटप आणि उमेदवार निश्चिती झाल्याने, निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बुधवार पासून प्रचाराला खऱ्या अर्थाने वेग येणार आहे. जागा वाटपाच्या मुद्यावरून महायुती आणि महाविकास आघाडीतील बेबनाव समोर आले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर सोयीस्कर युती आघाडीवर सर्वच राजकीय पक्षांनी भर दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी युती आणि आघाडीतील घटक पक्षच एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र पहायला मिळत आहेत