हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारमेळाव्यासाठी आलेल्या पालकमंत्री वर्षां गायकवाड यांनी शनिवारी पीक पाहणी दौराही उरकला. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणीची औपचारिकता त्यांनी उशिरा का असेना पूर्ण केली. मात्र, त्यांच्या या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. मोठे नुकसान होऊनही हिंगोली जिल्हय़ात एकाही बडय़ा नेत्याने भेट दिली नव्हती. किमान पालकमंत्र्यांनी तरी पाहणी करावी, अशी अपेक्षा होती. मात्र, पालकमंत्रीही फिरकलेच नाही. दरम्यान, केंद्रीय पथकाचा अहवाल सादर होतो न होतो तोच शनिवारी सायंकाळी सहाव्यांदा पुन्हा गारांचा तुफान पाऊस झाला.
जिल्ह्यात पाच वेळा झालेल्या गारपिटीमुळे ४० हजार हेक्टरच्या वर शेतातील पिकांचे नुकसान झाले. २५ हजार हेक्टरच्या वर ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याने बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला. हातातोंडाशी आलेला घास मातीत मिळाल्याने शेतकऱ्यांसमोर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. जिल्ह्यात तीन शेतकरी दगावले, अनेकांची गुरेढोरे मरण पावली, गहू, हरभरा, ज्वारीसह फळबागेचे मोठे नुकसान झाले. शासनाने मदत करावी, शेतकऱ्यांचे अश्रू पुसून त्यांना धीर द्यावा, ही अपेक्षा व्यक्त केली जात होती. जिल्ह्यातील आमदार भाऊ पाटील गोरेगावकर, राजीव सातव,  जयप्रकाश दांडेगावकर, महसूल विभाग व केंद्रीय पथकाकडून पीक नुकसानीची पाहणी झाली.
िहगोलीत काँग्रेसच्या पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर हा मेळावा होता. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. मेळाव्यात हजेरी लावण्यासाठी पालकमंत्री वर्षां गायकवाड यांना उपस्थित राहणे आवश्यक बनल्याने त्या िहगोलीत आल्या आणि पीक नुकसानीच्या पाहणीची औपचारिकता पूर्ण केली.
पालकमंत्र्यांनी तालुक्यातील सांडस, िपपळदरी, सिरसम या गावांतील शेतांना भेटी देऊन पीक नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी दु:खाचा पाढा पालकमंत्र्यांसमोर वाचला.